
आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजूर प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. शिवसेना आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठिशी ठाम असून, त्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारू, असा विश्वास पदाधिकाऱयांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिवसेना जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी, जिल्हा संघटक ऍड. अमोल बोराडे, तालुकाप्रमुख महेश नवले, संपर्कप्रमुख मिलिंद मांडळकर, तालुकाध्यक्ष संतोष मुतडक, शहराध्यक्ष नितीन नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एकात्मिक बाल विकास अधिकारी देवकन्या बोकडे यांना निवेदन दिले.
नवीन जीआरमधील वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द करावी, सेंट्रल किचनचा निर्णय मागे घेऊन वसतिगृहातच दर्जेदार व सात्त्विक भोजन द्यावे, सर्पदंशाच्या घटनांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत व पीडित आदिवासी विद्यार्थिनींना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. कोटय़वधी रुपये खर्चून प्रकल्प उभारूनही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. पाणी, भोजन, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.





























































