
उपोषण करायचे तर करा, पण ते खाऊन पिऊन करा, असा अजब सल्ला आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. हा सल्ला कोणी ऐऱ्यागैऱ्याने नव्हे तर थेट राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिला आहे. मागील १४ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी उपोषण करत आहेत. गांधीतत्त्वाप्रमाणे आपण आंदोलन करत असतो. मीदेखील आंदोलन करताना चोरून खायचो आणि आंदोलन करायचो, असेही ते यावेळी म्हणाले. झिरवळ यांच्या या सल्ल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले असता केवळ ‘सॉरी’ असे सांगून त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना भेट देण्यासाठी आदिवासी मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ हे दोघे आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर बोलताना विद्यार्थ्यांना हा अजब सल्ला दिला. ‘तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर जेवण करून करा. खाऊन पिऊन करा. मीही अनेक उपोषणे केली आहेत. उपोषण करताना मी चोरून लपून खायचो. तुम्ही खूपच कडक उपोषण करत आहात. कृपया असे उपोषण करू नका. स्वतःच्या जीवाचे नाहक हाल करून घेऊ नका,’ असे ते यावेळी म्हणाले.



























































