यंदाच्या गणपतीत माणगाव बायपास सुरू होणे अशक्य, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अखेर पालकमंत्री गोगावलेंची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेने नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या घोषणांची पोलखोल झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपास सुरू करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. हा बायपास गणपतीमध्ये सुरू होणार नाही, अशी कबुली देण्याची नामुष्की रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावर ओढावली आहे.

कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याच्या घोषणा गेल्या काही दिवसांपासून केल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्षात माणगाव बाह्यवळण मार्गावरील महत्त्वाचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे माणगाव बाह्यवळण मार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार नसल्याची कबुली रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार सुनील तटकरे यांनी गणेशोत्सवापूर्वी माणगाव बाह्यवळण मार्गाची किमान एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोकणवासीय आणि गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांच्या उत्साहावर आता विरजन पडले आहे.

– शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यानंतर माणगाव बाह्यवळणाच्या कामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या दौऱ्यात महामार्गाच्या कामाची अक्षरशः पोलखोल झाली. काम संथ गतीने सुरू असल्याने सरकारविरोधात गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

– आतापर्यंत करण्यात आलेल्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाची स्थिती वेगळी असल्याचे समोर आले आहे. या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कोकणात जाणारे भाविकांचे सालाबादप्रमाणे मोठे हाल होणार आहेत.

– गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघर तसेच राज्यातील अन्य भागांतून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात दाखल होतात. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण होणार नसल्याने यंदाही वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे