
30बाभुळगावातील संत जनी या नामदेवांच्या जनाबाईंचा अवतार समजल्या जात. त्यांना दत्तात्रयांचे वेड होते. संत जनी यांच्याकडे अध्यात्मिक आणि ब्रह्मविद्येची ताकद होती. या विद्येच्या जोरावर त्या गुरे चारायला नेल्यावर, इतर गुराखी मुलांना योगबलाने तूपपोळी खाऊ घालायच्या. लहान मुलं खूश होऊन त्यांच्यासोबत गुरं चारायला जायची. गोले गावास मठ उभारून तिथे दत्तात्रेयस्वामींची स्थापना करून परमार्थ मार्ग म्हणजे काय, हे लोकांना समजावण्याचा प्रयत्न त्यानी केला. लोकांमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन त्यांनी केले. त्यांच्या अंगात प्रचंड योगिक शक्ती होती, परंतु या शक्तीचा त्यांनी स्वतसाठी कधीही उपयोग केला नाही. त्या उत्स्फूर्तपणे रचना रचत आणि गात परंतु त्यांच्या रचना आज उपलब्ध नाहीत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी दत्तभक्ती आणि सेवेत घालवले. यामुळेच त्यांच्या भक्तांचा पंथ उभा राहिला.





























































