
>> अरुण जोशी
मराठी संस्कृतीचा जागर करणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन नुकतेच अमेरिकेत पार पडले. कला व साहित्यरसिकांच्या या उत्सवाचा हा आढावा.
अमेरिकेत दर दोन वर्षांनी मराठी संस्कृतीचा जागर करणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन भरते. जवळपास बेचाळीस वर्षांपूर्वी (1984 साली) शिकागो येथे त्याची सुरुवात झाली. तिथल्या विविध राज्यांतील बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या एकत्रित योगदानातून साकारलेल्या या अधिवेशनामध्ये एकेका राज्याला त्याच्या आयोजनाचा मान मिळतो. या वर्षी सिअॅटल येथे हे अधिवेशन 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान संपन्न झाले. बोईंग या विमान कंपनीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या शहरातील प्रचंड कनव्हेंशन सेंटरमध्ये आयोजित या अधिवेशनाला अमेरिकेतील विविध ठिकाणांहून मराठी मंडळी आली होतीच, तसे जगभरातील मराठी रसिकही यात सामील झाले होते.
ग्रंथाली ही वाचनप्रसारासाठी प्रसिद्ध चळवळ आहे. खेडोपाडी पुस्तके नेण्याचे आणि वाचनानुकूल वातावरण निर्माण करून ते जोपासण्याचे कार्य ग्रंथाली गेली 52 वर्षे करत आहे. 1993 सालापासून ग्रंथाली अमेरिकेतल्या या अधिवेशनामध्ये मराठी पुस्तकांचा स्टॉल घेऊन सहभागी होते आहे. या वर्षीही ग्रंथाली सहभागी झाली.
खाद्यपदार्थ, दागिने, साडय़ा, मसाले, कपडे असे विविध प्रकारचे स्टॉल असताना मराठी पुस्तके सातत्याने नेणारी ग्रंथाली बहुधा एकमेव आहे.
‘जपूया संस्कृती, विणूया नाती’ हे घोषवाक्य घेऊन सिअॅटल येथे साजऱया होणाऱया या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी बिझनेस कॉन्फरन्स योजली होती. पुढचे 3 दिवस संगीत, नाटय़, लोकसंगीत, गायनस्पर्धा, एकांकिका अशा कार्पामांनी सजले होते. फोक आख्यान या लोकसंगीतावरील प्रसिद्ध कार्पामाने श्रोत्यांना ठेका धरायला लावला, तर आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने रसिक मुग्ध झाले. प्रशांत दामले आणि संकर्षण कऱहाडे यांच्या गप्पा खुमासदार झाल्या. प्रशांत दामले यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणं गाऊन रसिकांना सुखावलं. तर संकर्षणच्या कवितांना चांगली दाद मिळाली. स्थानिक कलाकारांनी सतीश आळेकर यांचे ‘महानिर्वाण’ हे नाटक उत्तम सादर केले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या यजुर्वेन्द्र महाजन, अशोक देशमाने यांच्या कामाचे प्रेझेंटेशन, भाषण पाहून श्रोते भारावले. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनात सारेगमप धर्तीवर रंगलेल्या ‘स्वरमंच’ या कार्पामात लोकसंगीत हे सूत्र घेऊन आयोजित गायनस्पर्धेची अंतिम फेरी होती. सलील कुलकर्णी व अन्य दोघांनी त्याचे परीक्षणही केले. ते प्रत्येक गाण्यानंतर संगीतकार-गीतकार यांच्याबद्दलचे किस्से सांगत होते. या वेळी स्थानिक कलाकारांसह गायक हृषीकेश रानडे आणि सलील कुलकर्णी यांनीही गाणी गायली. शिवाय त्यांचा मुलगा शुभंकर याची स्वतंत्र मैफल श्रोत्यांना खूप आवडली.
बीएमएमच्या इतिहासातील हे बाविसावे अधिवेशन. मराठी वारसा, संस्कृती, संगीत, कला, समाजभान आणि व्यापार अशा सर्व विषयांना सामावून घेत उत्तम प्रकारे संपन्न झाले. सांगताच्या समारंभात पुढील संमेलन वॉशिंग्टन डीसी येथे होणार असल्याची घोषणा झाली. त्यापूर्वी विविध संस्था, व्यक्ती यांच्या विशेष योगदानाची दाखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.





























































