आधी दगडाने ठेचले मग् गळा आवळला; मित्राच्या मदतीने वडिलांनीच केली मानसिक आजारी मुलाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीत एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. स्किझोफ्रेनिया (मानसिक आजार) या आजाराने ग्रस्त असलेल्या ३८ वर्षीय मुलाची त्याच्याच ६४ वर्षीय वडिलांनी साथीदाराच्या मदतीने निर्घृण हत्या केली आहे. गुल हसन असे मृत मुलाचे नाव असून, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका बेवारस कंटेनरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचे वडील तालुकदार अन्सारी आणि त्यांचा ४९ वर्षीय साथीदार मोहम्मद वसीम उर्फ अक्रम यांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांनी मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे त्याच्या डोक्यात जड दगडाने वार करण्यात आला. त्यानंतर कापडापासून बनवलेल्या दोरीने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला दगड आणि हत्येसाठी वापरलेली दोरी जप्त केली असून, फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

२३ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांना एक्स्प्रेसवे जवळ, एनटीपीसीच्या भिंतीलगत असलेल्या एका पडक्या कंटेनरमध्ये मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. स्थानिक पातळीवर हा कंटेनर ‘बबलूचा कंटेनर’ म्हणून ओळखला जातो. माहिती मिळताच पोलिसांनी घटना गाठून तपास सुरू केला. मृताच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्याने पोलिसांनी तातडीने चार विशेष पथके तयार केली. या पथकांनी परिसरातील आणि जवळील रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी केली.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुल हसन दोन व्यक्तींसोबत त्या कंटेनरच्या दिशेने जाताना स्पष्ट दिसत होता, मात्र तिथून तो एकटा परतताना दिसला नाही. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सोबत गेलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे हे दोन्ही आरोपी गोविंदपुरी येथील एका टेलरिंग कारखान्यात लपल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना अटक केली असून, मानसिक आजारी मुलाला संपवण्यामागचे नेमके कारण काय होते, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.