
धाकट्या भावाचे दुःखद निधन झाल्याची बातमी समजताच काही वेळातच थोरल्या भावानेही अखेरचा श्वास घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथे शनिवारी घडली. दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दोन्ही भावांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
भाऊराव निवृत्ती राठोडकर (वय – 90) आणि माणिकराव निवृत्ती राठोडकर (वय – 85) अशी मृत भावांची नावे आहेत. भाऊराव राठोडकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यांच्या घरी जमा झाले होते.
मोठ्या भावाची गंभीर अवस्था पाहून धाकटे भाऊ माणिकराव यांना अश्रू अनावर झाले. भावाच्या प्रकृतीची चिंता आणि दुःखाच्या आवेगात त्यांना अचानक श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी वाहनातून रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच माणिकराव यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, घरी असलेल्या मोठ्या भावाने भाऊराव राठोडकर यांनीही त्याच सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे काही क्षणांच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने राठोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने केळगावातील ग्रामस्थही हळहळले.
दोन्ही भावांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 1 वाजता केळगाव येथे शोकाकुल वातावरणात एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊराव राठोडकर यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. तर माणिकराव राठोडकर यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.


























































