
गेल्या दोन आठवड्यांपासून सोने चांदीच्या दरात जबरदस्त तेजी आली होती. मात्र, अमेरिकेच्या फेडरल बँकेने दरवाढीचे संकेत दिल्याने सोने चांदीच्या दरावाढीला ब्रेक लागला असून सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वायदे बाजारात (कमोडिटी मार्केटमध्ये) शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. MCX वर सोन्याचा भाव सायंकाळी उशिरा ४००० ने घसरला, तर चांदीच्या दरात ९००० रुपयांची घसरण झाली. मात्र, काही वेळाने दरात थोडी सुधारणा झाली.
MCX वर व्यापार बंद होताना, ५ ऑक्टोबरच्या फ्युचर्ससाठी सोन्याचा भाव २५९६ किंवा १.६३% ने घसरून प्रति १० ग्रॅम १५६४०० वर आला होता. त्याचप्रमाणे, ४ सप्टेंबरच्या फ्युचर्ससाठी चांदीचा भाव ४,००० किंवा १.६६% ने घसरून प्रति किलो २३६,६५१ झाला होता.
सराफा बाजारात शुक्रवारी ९९.९% शुद्धतेच्या २४-कॅरेट सोन्याचा भाव गुरुवारच्या १,६५,७०० च्या तुलनेत ३,३०० ने घसरून प्रति १० ग्रॅम १,६२,४०० झाला. तीन दिवसांत सोन्याचे भाव ४,७०० ने म्हणजेच सुमारे ३ टक्क्यांनी घसरले आहेत. सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरातही घसरण झाली. देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव ५,००० ने घसरून २,४५,५०० प्रति किलो झाला. मागील सत्रात चांदीचा भाव २,५०,५०० प्रति किलो होता.
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे यूएस फेडरल रिझर्व्हचे एक निवेदन. यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख केविन वॉर्श यांच्या भाषणातून नजीकच्या काळात व्याजदरात संभाव्य वाढीचे संकेत मिळाले आहेत. फेड व्याजदरात २ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. याचा परिणाम जागतिक सोन्या चांदीच्या किमतीवरही झाला आहे.जागतिक बाजारात सोन्याचे दर ३.४३ टक्क्यांनी घसरून प्रति औंस ४,५०४.१० झाले. त्याचप्रमाणे, चांदीचे दर ४.५७ टक्क्यांनी घसरून प्रति औंस ६६.२५५ झाले.
























































