
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून, शेजारील देशाला तातडीने मानवीय मदत पुरवावी आणि तिथे अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना २८ ऑगस्ट रोजी पत्र लिहिले आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रात नेपाळमधील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली असून, हजारो नागरिकांना अन्न, औषधे आणि निवाऱ्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हिंदुस्थान आणि नेपाळच्या लोकांमध्ये अत्यंत दृढ आणि जुने संबंध आहेत. त्यामुळे या अत्यंत कठीण आणि दु:खाच्या काळात हिंदुस्थानने आपल्या शेजाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शक्य ती सर्व मदत केली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीचा संदर्भ देत खरगे यांनी म्हटले आहे की, जवळपास ३२० हिंदुस्थानी नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे नेपाळच्या विविध भागांत अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्या शोधासाठी बचावकार्य जलद करण्याचे आणि त्यांच्या सुरक्षित परतण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
























































