
मराठा-कुणबी प्रमाणपत्रे दिल्यानंतर जात पडताळणी समित्यांमध्ये ही प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोप करत त्या समित्या बरखास्त करा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज केली. मनोज जरांगे यांनी आज शनिवारी आंतरवाली सराटीत 11वे उपोषण सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी संघर्ष करत असल्याचे सांगत ही शेवटची आणि निर्णायक लढाई आहे. त्यामुळे मराठय़ांनी गाफील न राहता एकजुटीने उभे राहण्याचे आवानहन जरांगे यांनी केले.
जात वैधता प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप नाही, असे सरकारकडून केवळ बोलले जाते; प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सरकार जाणूनबुजून एका अधिकाऱयाकडून दुसऱ्या अधिकाऱयाकडे जबाबदारी ढकलत असून त्याचा फटका मराठा समाजाला बसतो. महाराष्ट्र राज्यात जात पडताळणी समित्या आहेत. देशात इतरत्र कुठेच त्या नाहीत, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे यांनीच दिली होती. मराठा-कुणबी प्रमाणपत्रे दिल्यानंतर जात पडताळणी समित्यांमध्ये ही प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. त्यामुळे या समित्याच बरखास्त करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.
सरकारने महाराष्ट्रातील सर्व केसेस मागे घ्याव्यात. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि मदत द्यावी. मराठय़ांच्या लेकरांनी आता वाट बघायची नाही. सरकारने जीआर काढला, त्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवला. मागणी घेऊन सरकारकडे गेल्यानंतर जीआरशिवाय दुसरे काय मागणार? मात्र जीआरनंतरही अंमलबजावणी होत नसल्याने सरकारनेच शांततेच्या मर्यादेचा भंग केला, असेही जरांगे म्हणाले.
58 लाख नोंदी सापडल्या
आतापर्यंत 58 लाख मराठा-कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. 58 लाख कुणबी नोंदींच्या मुद्दय़ावर सरकारने आतून षडयंत्र रचले असून सरकारकडून वेळोवेळी डावपेच आखले जात आहेत. नोंदींची संख्या कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी चार कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली. ही प्रमाणपत्रे रद्द करण्यासारखी नव्हती. कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज घेतले जात नसल्याचे जरांगे म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये श्रेयाची लढाई?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जातील, या भीतीने किंवा श्रेयासाठी सरकारमध्ये लढाई सुरू असून त्यात मराठा समाज भरडला जात आहे. शिंदे यांनी 58 लाख नोंदी असल्याचे सांगितले आणि आता भाजपकडून नोंदी नाहीत, असे सांगितले जाते. ‘मग आम्हाला शिंदेंनी फसवले असे सांगायचे का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आंतरवाली सराटीत येण्याचे मराठय़ांना आवाहन
मला उद्यापासून बोलता येणार नसून त्यामुळे आज मी समजापुढेच माझे म्हणणे मांडतोय. आता माघार नाही. घरात बसून न राहता आता मुंबई असो किंवा आंतरवाली सराटी असो आपल्याला रस्त्यावर उतरायचे आहे, असे म्हणत मराठा समाज बांधवांनी तातडीने आंतरवाली सराटी येथे यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.



























































