
‘देशभक्तीचे सिनेमे हे माझ्या देशाचे सिनेमे आहेत. ते चुकीचे वाटण्याचे काहीच कारण नाही. ज्यांना ते चुकीचे वाटत असतील किंवा आवडत नसतील त्यांनी देश बदलावा. देश सोडून जावे,’ असे वक्तव्य अभिनेते परेश रावल यांनी आज केले.
इंदूरमधील नरसी मोनजी इन्स्टिटय़ूटच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अलीकडे देशभक्तीपर सिनेमे मोठय़ा संख्येने येत आहेत. ओटीटीवरही काही सीरिज सुरू आहेत. मात्र हे सिनेमे विशिष्ट राजकीय हेतूने आणि विशिष्ट विचारधारेचा प्रचार करण्याच्या हेतूने बनवले जात असल्याची टीका होत असते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता परेश रावल म्हणाले, ‘देशभक्तीच्या सिनेमांकडे मी देशभक्ती म्हणूनच पाहतो. मी चुकीच्या नजरेने त्याकडे का बघू? तो सिनेमा चांगला आहे की नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण मला ते आवडतच नाहीत किंवा चुकीचे आहेत असे म्हणणे योग्य नाही. कोणाला तसे वाटत असेल तर त्यांनी देश बदलावा.’
बोलणारे बोलत राहतात, दुर्लक्ष करा!
‘एकेकाळी भगतसिंगांवर तीन-तीन सिनेमे आले होते. तेव्हा हे लिबरल लोक कुठे होते, असा सवाल परेश रावल यांनी केला. ‘बोलणारे लोक बोलत असतात. त्यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा,’ असे त्यांनी सांगितले.
तरुणांना आत्मचिंतनाची गरज
‘हिंदुस्थानची नवीन पिढी जोश आणि उत्साहाने भरलेली आहे, परंतु त्यांनी सावधगिरीने पावले उचलली पाहिजेत आणि बाह्य प्रभावाखाली येऊन स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये. नकारात्मक प्रभावाखाली आल्यामुळे तरुणांच्या नेतृत्वाखालील अनेक क्रांती थांबल्या किंवा भरकटल्या, असा दावा करतानाच, आजच्या तरुणांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे परेश रावल म्हणाले.
प्रश्नपत्रिका विकत घेण्यासाठी पालकांकडून पैसे
पेपरफुटीच्या मुद्दय़ावरही त्यांनी भाष्य केले. ‘संपूर्ण शिक्षण पद्धतीत सुधारणेची गरज आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालकांना आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. फुटलेली प्रश्नपत्रिका मुले विकत घेत असतील, तर साहजिकच पालकांनी त्यासाठी पैसे दिले असणार. पालकांनी अशा अनुचित कृत्यांना पाठिंबा देऊ नये,’ असे ते म्हणाले.

























































