
सूर्य मावळतीकडे झुकलेला, उजेड कमी झालेला, चौफेर प्रचंड बर्फ, बोचरे वारे आणि हाडं गोठवणारी थंडी… अशा प्रतिकूल परिस्थितीतही लडाखमधील नन कुन पर्वताजवळ 18,600 फुटांवर अडकलेल्या रुग्णाचे हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी प्राण वाचवले. एका लँडिंग गिअरवर हेलिकॉप्टरचा तोल सावरत ‘आर्मी एव्हिएशन’च्या वैमानिकांनी रुग्णाला एअर लिफ्ट केले. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
लडाखच्या कारगिल भागातील नन कुन पर्वताजवळ राहणाऱ्या एका रुग्णाची प्रकृती अचानक खालावली. त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. मात्र 18,600 फुटांवर हे रेस्क्यू ऑपरेशन राबवणे सोपे नव्हते. कमी उजेड, वेगवान वारे आणि कडाक्याची थंडी असतानाही ‘आर्मी एव्हिएशन’च्या वैमानिकांनी धोका पत्करला. या उंचीवर हवेचा दाब अत्यंत कमी असल्याने इंजिनाची क्षमता आणि रोटर लिफ्ट मोठ्या प्रमाणात घटते.
In a daring rescue mission at 18,600 ft near Nun Kun, Indian Army Aviation pilots evacuated a casualty from an extremely challenging slope with no landing space and strong winds.
With the helicopter lightened by removing non-essential equipment and carrying limited fuel, the… pic.twitter.com/dNaqrbljOp
— ANI (@ANI) August 29, 2026
हवेची घनता कमी असल्याने हेलिकॉप्टरचे वजन शक्य तितके कमी करणे अनिवार्य होते. यासाठी वैमानिकांनी विमानातील सर्व अनावश्यक उपकरणे बाजूला काढून वजन किमान मर्यादेपर्यंत आणले. इतकेच नव्हे तर, केवळ बचाव स्थळापर्यंत पोहोचून परत येण्यापुरतेच मर्यादित इंधन विमानात भरण्यात आले होते, जेणेकरून हेलिकॉप्टरला जास्तीत जास्त लिफ्ट मिळू शकेल.
सदर ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी कोणतीही सपाट जागा उपलब्ध नव्हती. चारही बाजूंनी उभ्या कड्यांचा डोंगर आणि प्रचंड वेगाने वाहणारे वारे यामुळे आव्हान दुप्पट झाले होते. अशा स्थितीत वैमानिकांनी हवेतच हेलिकॉप्टर स्थिर ठेवले आणि अत्यंत कौशल्याने हेलिकॉप्टरचा फक्त एकच स्कीड टेकवून तोल सांभाळला. या थरारक परिस्थितीत काही सेकंदांतच रुग्णाला सुरक्षितपणे एअर लिफ्ट करण्यात आले आणि क्षणाचाही विलंब न लावता हेलिकॉप्टरने सुरक्षित उड्डाण केले.
दरम्यान, लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या मोहिमेची माहिती शेअर केली. 18,600 फुटांवर पार पडलेली ही मोहीम आर्मी एव्हिएशनच्या वैमानिकांचे अतुलनीय कौशल्य, धैर्य आणि समर्पणाचे जिवंत उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका स्कीडवर लँडिंग करून रुग्णाला वाचवणे ही वैमानिकांच्या तांत्रिक अचूकतेची पावती आहे, असे फायर अँड फ्युरी कॉर्प्सने म्हटले.


























































