पूर्वांचलमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव; वाराणसीसह तीन जिल्ह्यात 18 सक्रिय रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्वांचलच्या वाराणसी, आझमगड आणि मिर्झापूर विभागांतील विविध जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूने डोकं वर केलं आहे. या आजाराने 18 सक्रिय रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाराणसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. पी. सिंग यांनी जिल्हास्तरीय रुग्णालयांसह सर्व सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये खाटा राखीव ठेवण्याचे आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना रोग निगराणी वाढवून संशयित रुग्णांची माहिती तात्काळ सरकारी पोर्टलवर नोंदवण्यास सांगितले आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाइन फ्लू हा श्वसनसंस्थेचा एक संसर्गजन्य आजार असून तो खोकल्याद्वारे, शिंकण्याद्वारे किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून वेगाने पसरतो. या आजारात तीव्र ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे किंवा बंद होणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, तीव्र थकवा अशी लक्षणे दिसतात, तर काही रुग्णांमध्ये उलट्या आणि जुलाबाचा त्रासही उद्भवू शकतो. लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि आधीच गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

सध्या आढळलेल्या 18 रुग्णांपैकी सर्वाधिक 4 रुग्ण वाराणसीमध्ये आहेत. याशिवाय आझमगडमध्ये 3, जौनपूर, मिर्झापूर, सोनभद्र आणि माऊमध्ये प्रत्येकी 2, तर गाझीपूर आणि बलियामध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. चंदौली आणि भदोही जिल्ह्यांत सध्या एकही रुग्ण नाही. वाढता संसर्ग रोखण्यासाठी वाराणसीतील दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात महिलांसाठी 6, पुरुषांसाठी 6 आणि मुलांसाठी 12 बेड राखीव ठेवण्यात आले असून बालरोगतज्ञ डॉ. ए. के. मौर्य आणि फिजिशियन डॉ. शैलेंद्र विक्रम व डॉ. नरेंद्र मौर्य यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच विभागीय रुग्णालयात 10 बेडचा आयसोलेशन वॉर्ड सज्ज करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हात वारंवार साबणाने धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे, पुरेसा आराम करणे आणि भरपूर द्रवपदार्थ घेणे गरजेचे आहे. तसेच लक्षणे आढळल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आजाराकडे दुर्लक्ष करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे किंवा अँटिबायोटिक्स घेऊ नयेत आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.