उरण उपजिल्हा रुग्णालयाच्या भूखंडावर खारफुटीचे जंगल, सर्वसामान्यांची आरोग्य सेवा अडकली सीआरझेडच्या कचाट्यात; प्रशासनाचा भोंगळ कारभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी उरण तालुक्यातील बोकडविरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१० मध्ये त्यास मंजुरीदेखील मिळाली. २०२४ रोजी भूमिपूजन झाले. मंजुरी मिळून १६ वर्षे उलटली तरी उपजिल्हा रुग्णालयाची एक वीटही अजून अद्यापि रचलेली नाही. त्या भूखंडावर सध्या खारफुटीचे जंगल निर्माण झाले असून सर्वसामान्यांची आरोग्य सेवा सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागातील प्रशासनाचा भोंगळ कारभारदेखील चव्हाट्यावर आला आहे.

उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी उरण तालुक्यातील बोकडविरा येथील पाच हजार चौरस मीटर भूखंड निश्चित करण्यात आला होता. चार मजल्यांची ही इमारत उभारण्यासाठी ८२ कोटी ५४ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले होते. मात्र सध्या त्या जागेवर रुग्णालयाऐवजी खारफुटीचे जंगल उभे राहिले आहे. उरण तालुक्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाढत चालली असून नवजात बालकांसाठी आवश्यक -असलेल्या अतिदक्षता विभागाची संख्याही अतिशय कमी आहे. त्याशिवाय इनक्यूबेटरचा अभाव असल्यामुळे स्थानिक नागरिकांना गंभीर आणि वेळेआधी जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या उपचारांसाठी नवी मुंबई, मुंबई, पनवेलमधील खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते.

सरकारी पातळीवर इनक्यूबेटर आणि व्हेंटिलेटरची सोय नसल्याने सामान्य व गरीब कुटुंबांना खासगी रुग्णालयांमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्याने बालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

उरणमध्ये १४ रुग्णालये आहेत. मात्र त्यापैकी फक्त ७ ते १० बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागाची तसेच इनक्यूबेटरची व्यवस्था आहे. यामध्ये शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात तर नवजात बालकांसाठी फक्त दोनच इनक्यूबेटर आणि व्हेंटिलेटरची सोय आहे.

इनक्यूबेटर, व्हेंटिलेटरची कमतरता
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात इनक्यूबेटर आणि व्हेंटिलेटरची व्यवस्थाच नाही. अन्य ठिकाणी तर त्याची विशेष कमतरता जाणवते. दर सहा महिन्यांत जिल्हा कमिटीच्या पथकाकडून फायर, वीज, स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. संकट काळात सुरक्षित बाहेर पडण्याची व्यवस्था आहे. अशी माहिती शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाबासाहेब काळेल यांनी दिली. यासाठी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय शक्य तितक्या लवकर उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.