
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणार्या भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय – 65, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला असून, ट्रॅव्हल्समधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 473.6, हडस पिंपळगाव शिवारात झाला. अपघात झाला तेव्हा ट्रॅव्हल्समध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस, महामार्ग पोलीस, तसेच रस्ता सुरक्षा पोलीसाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील पोलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

दरम्यान, समुद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे खळबळ उडाली असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.




























































