
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेश मूर्तींच्या आगमन आणि विसर्जन पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने दिंडोशी विधानसभेतील पी पूर्व विभागात बैठक पार पडली. सहाय्यक महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्डय़ांचे विघ्न दूर करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.
दिंडोशी विधानसभेचे शिवसेनेचे विभागप्रमुख – आमदार सुनील प्रभू यांच्या पुढाकाराने आणि प्रमुख उपस्थितीत पी पूर्व विभागाच्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्त रूपाली सरमळकर यांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने आगमन व विसर्जन मार्गांवरील खड्डय़ांची दुरुस्ती, पर्यायी कृत्रिम तलावांची योग्य व्यवस्था, उंच गणेशमूर्तींच्या मिरवणुकीत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, उत्सव काळात स्वच्छता व कचरा उचलण्याची चोख व्यवस्था, निर्माल्य संकलनाची सुयोग्य व्यवस्था तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुयोग्य वाहतूक नियोजन व पोलीस बंदोबस्त या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला नगरसेवक सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, योगिता कदम, विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभाग प्रमुख गणपत वारिसे, सुनील गुजर, प्रदीप निकम तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































