तिलकच्या शतकामुळे दक्षिण विभागाला आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावत संघाला दमदार आघाडी मिळवून दिली. फलंदाजीसाठी कठीण असलेल्या खेळपट्टीवर त्याने उत्तर विभागाविरुद्ध 219 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्यामुळे दक्षिण विभागाला दिवसअखेर 9 बाद 285 अशी मजल मारता आली आणि त्यामुळेच त्यांना 90 धावांची आघाडी मिळाली आहे.

तिलकचे प्रथम श्रेणीमधील आठवे शतक

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तिलक 106 धावांवर खेळत होता. त्याने आतापर्यंत 225 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार मारले आहेत. हा तिलकच्या कारकीर्दीतील 24वा प्रथम -श्रेणी सामना आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर पाच अर्धशतके आहेत. त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. 23 वर्षीय तिलक वर्माने हिंदुस्थानसाठी 59 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता, ज्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती

बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राऊंड-2 वर उत्तर विभागाचा संघ अवघ्या 195 धावांवर सर्व बाद झाला. सलामीवीर कामरान इक्बालने 76 धावा केल्या. विध्वथ कावेरप्पाने चार बळी घेतले. दक्षिण झोनचे चार फलंदाजही धावा करण्यात अपयशी ठरले. पण तिलकला श्रेयस गोपालची साथ मिळाली, ज्याने 88 धावा केल्या. दक्षिण विभागाने अवघ्या 80 धावांत पाच गडी गमावले होते. तिलक आणि श्रेयसने 175 धावांची भागीदारी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर पुन्हा त्यांचे विकेट्स पडू लागले. श्रीलंका दौऱ्यात राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसलेल्या गुरनूर ब्रारने 4 विकेट्स घेतले, तर अर्शदीप सिंग आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केले.