
गणेशोत्सव चौदा दिवसांवर आला असून सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. गणपती कारखान्यात मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. शहापूरच्या मूर्तिकारांनी तयार केलेल्या आकर्षक गणेशमूर्ती फॉरेन टूरला निघाल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तीना फॉरेनमध्ये मोठी मागणी आहे. आतापर्यंत दीड हजार गणेशमूर्ती दुबई, थायलंड, केनिया, जर्मनी, मलेशिया, साऊथ आफ्रिका, लंडन या ठिकाणी विमानाने रवाना झाल्या आहेत.
शहापूर येथील सुमित शेट्टी व त्यांची पत्नी केतकी या दोघांचीही कोरोनात नोकरी गेली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला उपासमारीला सामोरे जायची वेळ आली होती. परंतु सुमित यांनी गणपती कारखान्यात काम केले असल्याने त्यांना मूर्ती बनवायचा अनुभव होता. याचाच फायदा सुमित त्यांची पत्नी आणि मित्रांच्या मदतीने गणेशमूर्ती बनवून प्रदर्शन व विक्री व्यवसाय सुरू केला. त्यांनी बनवलेल्या मूर्तींना भरघोस प्रतिसाद मिळाला.
सहा इंच ते चार फुटांपर्यंत मूर्ती बनवून विक्रीसाठी ठेवल्या असून त्याची किंमत १ हजार ५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहेत. गुजरात, संभाजीनगर, जालना, ठाणे, कल्याण येथून या गणेशमूर्तीना मागणी वाढली असतानाच आता मलेशिया, साऊथ आफ्रिका, थायलंड, लंडन, ऑस्ट्रेलिया व दुबई या ठिकाणी गणेशभक्तांच्या मागणीनुसार मूर्ती पाठवल्या आहेत.
विघ्नहर्ता पावला
सध्या त्यांच्याकडे २१ कर्मचारी काम करत आहेत. बाहेरगावी ने-आण सोयिस्कर व्हावी यासाठी चेंबूर येथे भाड्याने कारखाना सुरू करण्यात आलेला आहे. मूर्तीच्या कच्च्या मालाची किंमत २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. शेट्टी दाम्पत्याने बनवलेल्या मूर्ती इंदोर, पालघर, पुणे, ठाणे, डोंबिवली व कल्याण आदी ठिकाणी रिटेल शॉपमध्ये विक्रीसाठी नेल्या जात आहेत. आम्ही बनवलेल्या मूतींना बाहेरच्या देशातून मागणी येत असल्यामुळे जणू विघ्नहर्ताच पावला आहे, असे रोट्टी दाम्पत्याने सांगितले.
कोरोनामुळे नोकरी गेल्याने आम्ही शहापुरात ६० गणपती मूर्ती बनवण्यापासून सुरू केलेला कारखाना आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे ९ ते १० हजार गणपती मूर्ती बनवण्यापर्यंत प्रवास पोहोचला आहे. त्यासाठी आमच्या दोघांची मेहनत व स्थानिक मित्रमंडळींच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.
केतकी शेट्टी व सुमित शेट्टी, मूर्तिकार





























































