
हिंदूंचा पवित्र श्रावण महिना सध्या सुरू असून देशभरात सणासुदीचा माहौल आहे. गणेशोत्सवासारख्या मोठय़ा सणामुळे भरपूर सुट्टय़ा मिळणार आहेत. देशातील जनता हे सगळे एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतानाच, ‘परदेशात जाऊ नका, सोने खरेदी करू नका,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. विशेष म्हणजे, मोदींनी किरगिझस्तानातून देशवासीयांना हे स्वदेशीचे धडे दिले आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा आर्थिक विकास दर 7.8 राहिल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ पोस्ट केला. ‘जगाला युद्धाने ग्रासले असताना आणि देशातील काही लोक निराशेचे वातावरण पसरवत असतानाही हिंदुस्थान वेगाने प्रगती करत असल्याचा दावा त्यांनी केला.’ ‘हा वेग आपल्याला कायम ठेवायचा आहे. त्यासाठी स्वदेशीचा मंत्र जपावा लागेल. त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील असे सांगून, परदेशात फिरायला जाऊ नका, लग्न समारंभ परदेशात करू नका. ‘वेडिंग इन इंडिया’चा मंत्र जपा. गरज नसेल तर सोनेही खरेदी करू नका, असे आवाहन मोदींनी केले.
पाकिस्तानने फोटो कापला
बिश्केक येथील ‘एससीओ’ परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांचा ग्रुप फोटो पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने फोटो आज सोशल मीडियात शेअर केला. मात्र ते करताना खोडसाळपणे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे अध्यक्ष पेजेश्कियान यांचे फोटो कापण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियात टीकेची झोड उठली. या टीकेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वतःच्या ‘एक्स’ हँडलवरून संपूर्ण फोटो शेअर केला.





























































