
महापालिकेची कार्यालये, मुख्यालय आणि विभागीय आस्थापनांमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) आधारित स्मार्ट गॉगल व चष्म्यांच्या वापरावर तातडीने पूर्णपणे निर्बंध आणावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या आधुनिक उपकरणांमुळे नागरिकांची गोपनीयता आणि शासकीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
यासंदर्भातील ठरावाची सूचना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाकडे सादर केली आहे. एआय आधारित स्मार्ट चष्मे आणि गॉगलमध्ये छुप्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून फोटो काढणे, व्हिडीओ रेकॉर्डिंग, ध्वनिमुद्रण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग करणे सहज शक्य आहे. यामुळे पालिकेच्या मुख्यालयातील तसेच विभागीय कार्यालयांमधील अत्यंत संवेदनशील माहिती लीक होण्याची आणि सुरक्षेचा भंग होण्याची मोठी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या बंदीच्या अंमलबजावणीसंदर्भात योग्य अभ्यास करून तातडीने अहवाल सादर करण्याची विनंती महापालिका आयुक्तांना ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली आहे. पालिकेच्या आगामी सभेत या ठरावावर चर्चा होऊन प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहेत मागण्या?
राज्य शासनाने एआय गॅझेट्समुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांची दखल घेत मानक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मंत्रालय, पोलीस ठाणे व न्यायालयांप्रमाणेच पालिका मुख्यालयातही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी पालिकेच्या सर्व कार्यालये व आस्थापनांच्या आवारात एआय चष्मे व गॉगलच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी आणि प्रवेशद्वारांवर सूचना फलक लावून सुरक्षा यंत्रणेला कडक अंमलबजावणीचे निर्देश द्यावेत.

























































