
कल्याण-डोंबिवली पालिकेची विविध विकासकामे पूर्ण करूनही गेल्या तीन वर्षांपासून ठेकेदारांची सुमारे २०० कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. बिले निघत नसल्याच्या निषेधार्थ आज कॉण्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने कल्याण महापालिका मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले.
१०० ते १५० ठेकेदारांची देणी रखडल्याने कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची बिले आणि कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. वाढत्या आर्थिक संकटामुळे ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाने तातडीने थकीत बिले अदा करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.





























































