
वनमंत्री कोंडा सुरेखा यांची मुलगी कोंडा सुष्मिता पटेल यांनी एका जाहीर कार्यक्रमात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर टीका केल्याने वनमंत्री सुरेखा यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून गुरुवारी यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. तसेच राज्यपाल शिव प्रताप शुक्ल यांनाही यासंबंधी कळवले आहे.
सुरेखा यांची मुलगी सुष्मिता यांनी वारंगल येथील एका कार्यक्रमात रेवंत रेड्डी आणि पक्ष नेतृत्वावर तिखट शब्दांत हल्ला केला होता. मुख्यमंत्री टीडीपी आणि बीआरएसमधून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देत आहेत. जुन्या आणि निष्ठावान काँग्रेस नेत्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. सुष्मिता यांच्या या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. यावर सुरेखा यांनी नोटिसीला उत्तर देताना म्हटले की, मुलीने केलेल्या टिप्पणीवर माझ्याकडे उत्तर मागणे योग्य नाही. मुलीच्या आरोपासाठी मला दोषी ठरवणे योग्य नाही. हे चुकीचे आहे.
मला मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे, याची कोणतीही अधिपृत सूचना मिळाली नाही. त्यामुळे मला असे हटवणे चुकीचे आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी पुढचे पाऊल उचलेन, असे सुरेखा यांनी सांगितले.


























































