
जगातील वेगवेगळ्या कंपन्या आता मनुष्यबळाऐवजी थेट एआयवर फोकस करत आहेत. यासाठी कर्मचारी कपात करून कोट्यवधी रुपये एआयमध्ये गुंतवत आहेत. अॅप-आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर या कंपनीने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 10 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कंपनीतील तब्बल 3,300 कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.
गेल्या पाच वर्षांत उबरचा मोठा विस्तार झाला, पण या वाढीसोबतच कंपनीची रचना गुंतागुंतीची झाली आहे. कामाचे अनेक टप्पे, समन्वय साधण्यात अडचणी आणि विखुरलेली जबाबदारी यामुळे निर्णय प्रक्रियेचा वेग मंदावला होता. त्यामुळे उबरला अधिक गतिमान करणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी निधी उभारणे, या दोन प्रमुख उद्देशांसाठी ही कपात करावी लागत आहे, असे कंपनीचे सीईओ दारा खोस्रोशाही यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
एआयमध्ये गुंतवणूक वाढवणार
‘सिटी’ या जागतिक गुंतवणूक बँकेच्या विश्लेषकांनी दिलेल्या अंदाजानुसार, या नोकरकपातीमुळे उबरची वर्षाला अंदाजे 6,800 कोटी रुपये बचत होणार आहे. हा निधी पंपनी स्वयंचलित गाड्या म्हणजेच ‘रोबोटॅक्सी’ आणि एआय तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी वापरणार आहे.
एआयमुळे नोकरकपातीची लाट
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या एआय आणि ऑटोमेशनमुळे नोकरकपातीची मोठी लाट आली आहे. ‘लेऑफ्स.एफवायआय’ या ट्रकिंग वेबसाइटनुसार, या वर्षात आतापर्यंत जगभरातील जवळपास 390 कंपन्यांनी 1,23,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.



























































