
रम आणि व्हिस्की उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केल्याने ब्रँड्सच्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीला तूर्तास स्थगिती देण्यास हायकोर्टाने आज नकार दिला. उपलब्ध साठा विकण्याची परवानगी दिल्यास ती अंतिम सवलत दिल्यासारखे होईल, असे निरीक्षण प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने नोंदवले. एफएसएसएआयने लेबलिंग नियमांचे उल्लंघन तसेच रमच्या वयाबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याच्या कारणावरून ‘ओल्ड माँक’च्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. याप्रकरणी ओल्ड माँकचे उत्पादन करणाऱ्या मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केंद्र सरकारसह अन्य काही जणांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून बंदी उठवण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आज गुरुवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

























































