
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने थकबाकीदार सहा संस्थांच्या विक्रीसाठी तब्बल पाचव्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यात पाच सूतरिगण्यांचा समावेश आहे. या सर्व संस्था जिह्यातील विविध बडय़ा नेत्यांशी संबंधित आहेत. गेली पाच ते सहा वर्षे या संस्था विक्री करून त्यांच्याकडून थकबाकी वसुलीचा प्रयत्न जिल्हा बॅँक करत आहे. मात्र, त्यात अद्याप यश आले नाही. यावेळी तरी या संस्थांची विक्री होऊन 234 कोटींपेक्षा जास्त थकबाकी वसूल होणार का, असा प्रश्न सभासदांतून विचारला जात आहे.
सांगली जिल्हा बॅँकेने स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी (ता. तासगाव), खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल गार्डी (ता. खानापूर), शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी (वाळवा), प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रिज (वाळवा), विजयालक्ष्मी कॉटन मिल्स (आटपाडी) या पाच सूतगिरण्यांसह डिवाईन फूडस प्रा. लि. या संस्थेचा लिलाव काढला आहे. यासाठी 21 ऑगस्टपर्यंत निविदा मागविल्या असून, 27 ऑगस्टला निविदा उघडल्या जाणार आहेत. या सर्व संस्थांकडून मिळून सुमारे 234 कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे.
सांगली जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीसाठी मागील संचालक मंडळाच्या काळात सिक्युरायझेशन ऍक्टअंतर्गत काही सहकारी संस्था व खासगी कंपन्यांवर कारवाई करत या संस्था ताब्यात घेतल्या. या संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅँकेने सातत्याने प्रयत्न केले. मागील संचालक मंडळाच्या काळात या संस्था भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचे तसेच विक्रीचे प्रयत्न झाले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या संस्थांकडील थकबाकीमुळे जिल्हा बॅँकेचा एनपीए मोठय़ा प्रमाणात वाढला होता. आरबीआयकडून याप्रकरणी कारवाईचा इशारा देण्यात आला. यानंतर जिल्हा बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात यातील चार सूतगिरण्या व महांकाली आणि माणगंगा हे दोन साखर कारखाने स्वतः खरेदी करत बॅँकेच्या ऍसेट वाढवत एनपीए कमी केला. त्यानंतरही बॅँकेने सदरच्या संस्था विक्रीसाठी तसेच भाडय़ाने देण्यासाठी निविदा मागवल्या; पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. यातील महांकाली व माणगंगा कारखान्याला बॅँकेने ओटीएसचा लाभ दिला आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या चार सूतगिरण्या, डिवाईन फूड्स कंपनी व स्वामी रामानंद भारती सूतगिरणी या सहा संस्थांची पुन्हा एका जिल्हा बॅँकेने लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.



























































