
>> विजय जोशी, नांदेड
तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या प्रसिद्ध बासर येथील श्री ज्ञान सरस्वती देवी मंदिराच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाल्याने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील भाविकांचे दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, भाविकांची धार्मिक सेवा खंडित होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने बालालयाची (तात्पुरत्या मंदिराची) व्यवस्था केली असून, तेथे सरस्वती मातेचे दर्शन व विविध धार्मिक विधी सुरू ठेवण्यात आले आहेत.
बासरच्या ज्ञान सरस्वती मंदिराचा वाढता लौकिक आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तेलंगणा सरकारने मंदिराच्या विकासासाठी सुमारे २२५ कोटींचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. या कामाचे भूमिपूजन एप्रिल २०२६ मध्ये करण्यात आले. श्रींगेरी शारदा पीठाच्या मार्गदर्शनाखाली या पुनर्विकासामध्ये मंदिर परिसराचा विस्तार, भव्य राजगोपुरम, नवीन अक्षराभ्यास मंडप, कोणेरी, भाविकांसाठी प्रशस्त दर्शन रांगा, ध्यानमंदिर, यज्ञशाळा, भोजन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, पार्किंग तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. मंदिर परिसराचे विद्यमान क्षेत्र सुमारे २० हजार चौरस फुटांवरून ६२ हजार चौरस फुटांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.
पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने मुख्य मंदिर परिसरात बांधकाम व सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मुख्य गाभाऱ्यात जाऊन सरस्वती मातेचे दर्शन घेता येणार नाही. मंदिरातील धार्मिक परंपरा आणि नित्यपूजा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या दर्शनासाठी स्वतंत्र बालालय उभारण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या पुनर्विकासाच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बालालयात सर्वदर्शन, विशेष दर्शन, अक्षराभ्यास, चंडी होम तसेच विविध धार्मिक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरस्वती मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुख्य मंदिराऐवजी बालालयातील दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा लागणार आहे. बासर हे ज्ञान, शिक्षण आणि सरस्वती उपासनेसाठी देशभरात प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र आहे. विशेषतः लहान मुलांचा अक्षराभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने बासर येथे येतात. त्यामुळे ‘सरस्वती मातेचे दर्शन पूर्णपणे बंद आहे. असा गैरसमज भाविकांनी करून घेऊ नये. मुख्य गाभाऱ्यातील प्रवेश बंद असला तरी बालालयात दर्शन आणि धार्मिक विधी सुरू आहेत, हे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बासर हे नांदेड, धर्माबाद आणि बिलोली परिसरातील भाविकांसाठी जवळचे आणि श्रद्धेचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी, सण-उत्सवांच्या काळात किंवा अक्षराभ्यासासाठी बासरला जाणाऱ्या कुटुंबांनी मुख्य मंदिरात प्रवेश मिळणार नाही. सध्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शनाला तात्पुरता विराम असला तरी भविष्यात बासरचे सरस्वती मंदिर अधिक भव्य स्वरूपात भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

























































