
फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2379 विमानातील मुख्य वैमानिकाच्या ड्रग्ज चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्याचे विमान अपघात तपास ब्युरोच्या (AAIB) प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, वैमानिकाच्या दोन स्वतंत्र चाचण्यांमध्ये मादक पदार्थांची उपस्थिती आढळली असून, दोन्ही चाचण्यांमध्ये गांजाच्या सेवनाची पुष्टी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत AAIB ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) तातडीने योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
4 ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीच्या दिशेने येत असताना हे विमान ओडिशाच्या हवाई क्षेत्रातून जात होते. हे विमान अचानक 36 हजार फूट उंचीवरून विमान काही क्षणांत सुमारे 300 फूटांपर्यंत खाली आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या अचानक झालेल्या उंचीतील बदलामुळे विमानातील किमान 24 जण जखमी झाले. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्य वैमानिकाची ड्रग्ज चाचणी करण्यात आली. या पहिल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर करण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीतही त्याच प्रकारचा निकाल आला. त्यामुळे वैमानिकाच्या शरीरात गांजाशी संबंधित मादक पदार्थ असल्याची पुष्टी झाल्याचे तपास अहवालात म्हटले आहे.
AAIB ने या घटनेला गंभीर बाब मानले आहे. विमानाच्या अचानक झालेल्या उंचीतील बदलामागे नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत होती, याचा तपास सुरू आहे. AAIB कडून या घटनेशी संबंधित सर्व बाबींची सखोल तपासणी केली जात आहे. घटनेमागील परिस्थिती आणि नेमकी कारणे निश्चित करणे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे, हा तपासाचा मुख्य उद्देश असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, AAIB च्या प्राथमिक अहवालावर एअर इंडियानेही प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइनने अहवालाची दखल घेतली असून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले जात आहे. तपासासाठी आवश्यक असलेल्या ऑपरेशनल, देखभाल आणि तांत्रिक नोंदी एअर इंडियाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. कंपनीचे वैमानिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार नियमितपणे कठोर प्रशिक्षण, प्राविण्य तपासणी आणि वैद्यकीय तपासणीतून जात असल्याचेही एअरलाइनने स्पष्ट केले.





























































