
नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. आता प्रसिद्ध ‘वाय वाय’ नूडल्सचे उत्पादन करणाऱ्या बिनोद चौधरी यांच्या मालकीच्या कंपनीविरोधात अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कठोर कारवाई केली आहे. राजस्थानमधील CG Foods India या कंपनीच्या कारखान्यात तपासणीदरम्यान जमिनीवर पडलेले तुटलेले नूडल्स गोळा करून त्यापासून स्नॅक्स तयार केले जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणानंतर संबंधित काही उत्पादनांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, FSSAIच्या अधिकाऱ्यांना कारखान्यात जमिनीवरून गोळा केलेल्या तुटलेल्या नूडल्सवर कोणतीही उष्णता प्रक्रिया न करता त्यांचा वापर ‘भुजिया’ तयार करण्यासाठी केला जात असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान तब्बल 32 हजार किलो साठा जप्त करण्यात आला, तर 1,925 बॉक्समध्ये एक्सपायर झालेली तयार उत्पादने आढळली. या प्रकरणी अन्न व्यवसाय चालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून विविध उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अन्नपदार्थ आणि ग्राहक उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. नवी मुंबईतील एका गोदामावर छापा टाकल्यानंतर एक्सपायरी आणि एक्सपायर होण्याच्या मार्गावर असलेल्या उत्पादनांवरील एक्सपायरी डेट व पोषणमूल्यांचे लेबल बदलल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. या गोदामातून जवळपास 5 हजार कार्टनमध्ये Lay’s, Kurkure, Maggi Masala Noodles, Thums Up, Limca आणि Knorr Mushroom Soup यांसारखी लोकप्रिय उत्पादने सापडली.

























































