
मणिपूरचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते केइशम मेघचंद्र सिंह यांच्या निवासस्थानाजवळ गुरुवारी रात्री बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. थौबल जिल्ह्यातील यैरीपोक परिसरातील विष्णुनहा येथे रात्री सव्वाआठच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या घराच्या गेटजवळ स्फोटक फेकले. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या भ्याड हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवडाभरात मणिपूरमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरावर झालेला हा दुसरा हल्ला असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ यैरीपोक विष्णुनहा परिसरातील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले. हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्यामागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी, पोलिसांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
या घटनेनंतर मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीने सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष हरेश्वर गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचा तीव्र निषेध करत, हा केवळ एका व्यक्तीवरील नसून लोकशाही मूल्यांवर आणि राजकीय प्रक्रियेवर झालेला हल्ला असल्याचे म्हटले आहे. राजकीय मतभेद हिंसेने नव्हे तर संवादाने सोडवले गेले पाहिजेत, असे ते म्हणाले आहेत. त्यांनी राज्य सरकार काँग्रेस पक्षाच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. यापूर्वीही काँग्रेस कार्यालयांवर आणि नेत्यांवर हल्ले होऊनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.


























































