
केसगळतीची समस्या ही अलीकडे सर्वांमध्येच दिसून येते. केसगळती रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे लगेच शॅम्पू बदलला जातो. परंतु केवळ शॅम्पू बदलल्याने हेअरफॉलची समस्या थांबेलच असे नाही. केस गळण्यामागे आनुवंशिकता, हार्मोनल बदल, ताणतणाव, पोषणाची कमतरता किंवा काही वैद्यकीय कारणे असू शकतात.
शॅम्पूचे मुख्य काम टाळू आणि केसांवरील तेल, घाण व धूळ साफ करणे हे आहे. त्यामुळे शॅम्पूला हेअरफॉलवर थेट उपचार मानणे योग्य नाही. मात्र, अतिशय कडक शॅम्पूमुळे केस कोरडे होऊन तुटण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
शॅम्पू करताना हातात आलेला प्रत्येक केस मुळापासून गळालेला असेलच असे नाही. अनेकदा केस तुटल्यामुळेही ते गळत असल्यासारखे दिसतात. केसांचा कोरडेपणा आणि चुकीची हेअर केअर पद्धत यामुळे केस तुटण्याचे प्रमाण वाढू शकते.
शॅम्पू मुख्यतः टाळूवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. नखांनी जोरात टाळू घासणे टाळावे. त्यामुळे त्वचेला इजा किंवा जळजळ होऊ शकते.
कोणताही शॅम्पू वापरताना पॅच टेस्ट करणे हे खूप गरजेचे आहे. पॅच टेस्ट केल्याने, त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते.
केस गळण्याचे प्रमाण सतत वाढत असल्यास किंवा टाळूशी संबंधित इतर समस्या जाणवत असल्यास वारंवार शॅम्पू बदलण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.


























































