‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर धूम; ‘धुरंधर 2’चा विक्रम मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

बॉक्स ऑफिसवर सध्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही दमदार कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे चौथ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत ‘हनुमान अंश’ने ‘धुरंधर 2’लाही मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे.

नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘हनुमान अंश’ने प्रदर्शनाच्या 28 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या गुरुवारी तब्बल 11 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सॅकनिल्कच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. 27 व्या दिवशी चित्रपटाने 7.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याच्या तुलनेत 28 व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत तब्बल 41.94 टक्क्यांची वाढ झाली.

‘हनुमान अंश’ने चौथ्या आठवड्यात तब्बल 61 कोटी रुपयांची नेट कमाई केली. तिसऱ्या आठवड्यातील 10.4 कोटी रुपयांच्या कमाईच्या तुलनेत चौथ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत तब्बल 86.54 टक्क्यांची वाढ झाली. प्रदर्शनाच्या 28 दिवसांत चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 72.88 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, त्याचे ग्रॉस कलेक्शन सुमारे 86 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे वृत्त आहे. चौथ्या आठवड्यात 61 कोटी रुपयांची कमाई करत ‘हनुमान अंश’ने बॉलिवूडच्या चौथ्या आठवड्यातील कमाईच्या विक्रमांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत ‘धुरंधर 2’ने चौथ्या आठवड्यात 56 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘हनुमान अंश’ने हा आकडा मागे टाकला आहे. या यादीत ‘धुरंधर’ 115.7 कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या स्थानावर असल्याचे सांगितले जात आहे.

‘हनुमान अंश’ अवघ्या 1.8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत चित्रपटाने 72.88 कोटी रुपयांची नेट कमाई केल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने 28 दिवसांत आपल्या बजेटच्या तुलनेत तब्बल 3948.88 टक्के परतावा मिळवला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘ब्लॉकबस्टर’ ठरल्याचे म्हटले जात आहे.