झोमॅटोला 250 ऐवजी 8250 द्यावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झोमॅटोवरून ऑर्डर रद्द झाल्यानंतरही रिफंड न मिळाल्याने ग्राहकाने थेट ग्राहक मंचाकडे धाव घेतली. आता या प्रकरणात 250 रुपयांच्या रिफंडसाठी झोमॅटोला 8 हजार 250 रुपये देण्याचे निर्देश ग्राहक मंचाने दिले आहेत.

मनोज कुमार या व्यक्तीने भाचीच्या वाढदिवासासाठी झोमॅटोवरून एकाच पत्त्यावर एकूण पाच वेगवेगळ्या फूड ऑर्डर केल्या होत्या. यापैकी तीन ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहोचल्या. परंतु, उर्वरित दोन ऑर्डर डिलिव्हर होण्याआधीच रद्द करण्यात आल्या. दोन्ही ऑर्डरची एकूण किंमत 250 रुपये होती. झोमॅटोकडून या ऑर्डर रद्द करण्यामागे ग्राहकाचा फोन नॉट रिचेबल हे कारण देण्यात आले.

डिलिव्हरी पार्टनरने ग्राहकाच्या फोन नंबरवर अनेक वेळा संपर्क साधला परंतु, तो होऊ शकला नाही, असे झोमॅटोने म्हटले. जर त्यांचा फोन खरोखरच उपलब्ध नव्हता तर तीन ऑर्डर यशस्वीपणे कशा डिलिव्हर झाल्या, असे सांगत ग्राहक आयोगाने झोमॅटोला 8 हजार 250 रुपये ग्राहकाला देण्याचे निर्देश दिले.