
>> स्वप्नील साळसकर
लागवड न करता आपल्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात उगवलेल्या रानभाज्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊन हल्ली वेगवेगळ्या स्तरावर रानभाजी महोत्सव साजरा केला जात आहे.
मागील पिढ्यांनी पारंपरिक आहार संस्कृती जपली म्हणूनच अनेक वर्षांचे निरोगी आयुष्य जगता आले. मात्र उत्पादन वाढवताना आर्थिक उन्नती साधण्याच्या स्पर्धेत रासायनिक खतांनी पिकवलेला भाजीपाला, फळे, फास्टफूडने शिरकाव केला आणि विविध आजार उद्भवले. म्हणूनच पुन्हा मागे वळून शाळा, महाविद्यालयात रानभाजी महोत्सव उपक्रम राबविले जात आहेत. याच निमित्ताने केलेला हा लेखन प्रपंच.
हिरवागार निसर्ग, जैवविविधता, मासेमारी, पर्यटन, लोककला, संस्कृती अशा असंख्य गोष्टींमुळे तळकोकण जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. मात्र या निसर्गसंपन्न जिह्यात भाजीपाला आजही घाटमाथ्यासह परजिह्यातून मोठ्या प्रमाणात येतो. हंगामी परसबाग आणि काही तालुक्यात होणारे गावठी भाज्यांचे उत्पादन वगळता आठवडा बाजारांमधूनच मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी केली जाते. लागवड न करता आपल्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात उगवलेल्या ज्या वनस्पती आहारात भाजी म्हणून वापर केला जातो. त्यामधून खनिजे, जीवनसत्त्वे, कर्बोदके, प्रथिने यांसह औषधी गुणधर्मही मिळतात.
महाराष्ट्रात पश्चिम घाट जागतिक जैवविविधता वारसा म्हणून मान्यता मिळालेला प्रदेश असून यामध्ये दोन हजार पाचशेपेक्षा जास्त वनस्पती प्रजातींचे वास्तव्य आहे. यापैकी 350 औषधी तर सर्वसाधारण 60 ते 70 प्रकारच्या वनस्पतींचे रानभाज्या म्हणून सेवन केले जाते.
पावसाळ्यात उगवणाऱया रानभाज्यांमध्ये माणसाला वर्षभर संरक्षण देईल एवढी क्षमता आहे. यामुळेच शरीर निरोगी होते आणि शाश्वत विकासही होत होता. माणूस हा निसर्गाचाच घटक आहे. त्यासाठीच नैसर्गिक आहार मिळाला तर प्रतिकार शक्तीही तेवढीच मजबूत राहते. रानभाजी हा निसर्गदेवतेने दिलेला ठेवा असून पर्यावरण संतुलनातही मोठी जबाबदारी ती पार पाडते.
रानभाज्यांमधील गुणधर्म पटवून सांगणारी ही शेवटची पिढी आहे. डोंगरभागात राहणारे कातकरी, धनगर बांधव यांना रानभाज्या, झाडांच्या पाळामुळांपासून औषधी गुणधर्मांची माहिती होती. सध्या जिह्यात ठरावीक ठिकाणी रानभाजी किरकोळ स्वरूपात विकताना पाहायला मिळते.
तणनाशकाचा वापर
डोंगरभाग तोडून आंबा, काजूच्या बागा अस्तित्वात आल्या. या बागांमधील गवत काढण्याची पद्धत बंद झाली. यांत्रिकीकरणामुळे या अगोदरच गाईगुरे यांची संख्या घटली आणि मग तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. करटोली- फागला, भारंगी, गुळवेल, कुर्डू, दुदुरली, अळू, अळंबी, टाकळा, घोट्याचे वेल, कुड्याच्या शेंगा, कनकीचा कोंब यांसारख्या अनेक रानभाज्या सध्याच्या घडीला उपलब्ध होत असल्या तरी काही दुर्मिळ झाल्या असून काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभाज्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये रानभाज्यांची पाककृती, जिल्हा – तालुका स्तरावर प्रदर्शन, विक्री आठवडा बाजारांची संकल्पना राबविण्यात येत असली तरी सध्याची पिढी कितपत हा नैसर्गिक ठेवा जपणार हा खरा प्रश्न आहे.
आमची खताची भाजी नाया ओ
अलीकडे गावठी आठवडा बाजाराची संकल्पना घेऊन जिह्यात अनेक ठिकाणी स्थानिक पिकवलेल्या भाज्या उपलब्ध होऊ लागल्या आहेत. वयस्कर आजी, आजोबा आपल्या परसबागा, शेतांमध्ये तयार केलेला माल विकताना “आमची खताची भाजी नाय वो’’ असं छातीठोकपणे सांगत विक्री करतात. शेणखताची मात्रा, रोपाच्या संरक्षणासाठी राख यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करीत शाश्वत उत्पादनासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
करटोली, अळंबीला व्यावसायिक रूप
आहारात स्वादिष्ट रानभाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या करटोली – फागला याला व्यावसायिक रूप आले असून अमेरिकेतही मोठी मागणी आहे. वरून काटेरी असलेले लहान आकाराच्या फळांसारखी ही रानभाजी सिंधुदुर्गात नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध होते. हलक्या पावसात वर्षातून एकदा मिळणारी अळंबी आता सहज मिळू लागली आहे. लहान व्यवसायाच्या निमित्ताने केली जाणारी मशरूमची शेती आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बनली आहे.


























































