तंजावरचे स्थलमहात्म्य – तंजावरी मराठी नाटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. समीर जाधव

[email protected]

नृत्यकलेसोबत नाट्यकलेचा उत्तुंग प्रयोगशील प्रवास तंजावरच्या भूमीत झाला. मराठी रंगभूमीचे आणि मराठी नाटकाचे जे अनेक ऐतिहासिक प्रेरणास्त्रोत आहेत त्यांपैकी तंजावरी रंगभूमी आणि नाटक हा एक महत्त्वाचा प्रेरणास्त्रोत आहे.

तंजावरचे सर्वच राज्यकर्ते हे केवळ  कलेचे आश्रयदाते नव्हते तर ते स्वतः प्रतिभासंपन्न असे कलाकारही होते. चित्रकला, हस्तकला, संगीत, नृत्यकलेसोबत नाट्यकलेचा उत्तुंग प्रयोगशील प्रवास तंजावरच्या भूमीत झाला. नायक राजवटीतील  रघुनाथ नायक  आणि विजयराघव नायक हे दरबारातील नृत्य आणि नाटकाचे उदार आश्रयदाते होते. नृत्य, संगीत आणि नाटकाचा वापर करून नायक  राजांनी समाजात आपले स्वतचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

अच्युतप्पा नायकाने अच्युतपुरम गावातील पाचशे कुटुंबांसाठी एक मोठा भूखंड दान केला होता; हे गाव नंतर उन्नतपुरम आणि आता मेलातूर म्हणून ओळखले जाते. प्रत्येक कुटुंबाला एक घर, एक विहीर आणि काही जमीन मिळाली. या गावात आजही दरवर्षी नृसिंह जयंतीच्या निमित्त पाच दिवसांच्या कालावधीसाठी ‘भागवतमेळा’ नाटक सादर करतात. अच्युतप्पाची पत्नी थिरुमलांबा ही स्वतः  नाटककार होती. तिने बकथा संजीवनी लिहिली आणि श्रीरंगम मंदिरात ती रंगवली. रघुनाथ नायक यांनी अनेक यक्षगानांची रचना केल्याचे उल्लेख आढळतात. विजयराघवच्या प्रल्हादचरित्र या ग्रंथात त्याच्या वीस नाटकांची नामावली आली आहे, परंतु आज केवळ विप्रनारायणचरित्र, प्रल्हादचरित्र, पूतनाहरण, कालियामर्दनम्  ही चार नाटके उपलब्ध असून सरस्वतीमहाल ग्रंथालयाने ती प्रकाशित केली आहेत.

नायक राजांनंतर आलेल्या सर्वच भोसले राजांनी राज्यकेंद्री, समाज-संस्कृतीकेंद्री कर्तव्ये पार पाडत असतानाच साहित्यादी कलांची मनपूर्वक जोपासना केली. प्रयोगशरण नाट्यकलेचा उगम आणि उत्तुंगावस्था इथपर्यंतचा लक्षणीय प्रवास शहाजीराजांपासून सुरू झाला आणि एकोजीराजे (पहिले), प्रतापसिंहराजे, शरभेन्द्रराजे (सरफोजीराजे), शिवाजीराजे (दुसरे) यांच्यापर्यंत तो अव्याहत राहिला. शहाजीराजे दुसरे, एकोजीराजे (एकेन्द्र दुसरे), प्रतापसिंहराजे, शरभेन्द्रराजे (सरफोजीराजे), शिवेंद्रराजे (शिवाजीराजे दुसरे) या राजांची अनेक नाटके लोकप्रिय ठरली. त्यांची एकूण चाळीस नाटके आज संशोधकांसाठी उपलब्ध आहेत.

शहाजीराजे लिखित गंगा-कावेरीसंवाद, लक्ष्मी-भुदेवीसंवाद, पंचभाषाविलास, सरफोजीराजे लिखित देवेंद्र कोरवंजी, त्र्यंबक ज्योतिर्विदलिखित राजकन्यापरिणय ही स्वतंत्र नाटके आहेत. ही नाटके वगळता वेगवेगळ्या कालखंडातील भोसले राजांनी लिहिलेली सर्व नाटके ही प्रामुख्याने भारतीय परंपरेत चालत आलेल्या मिथकांवर आधारित आहेत. सर्व भोसले राजांनी ज्याप्रमाणे मराठी भाषेत नाट्यलेखन केले त्याप्रमाणे तमीळ, तेलुगू या भाषांमध्येही नाट्यलेखन केले आहे. तंजावर येथील भोसले राजेलिखित नाटके यक्षगान व भागवतमेळा या लोकसंस्कृती परंपरेतील नाट्यबंधाचा अवलंब केलेला आहे. या सर्वच नाटकांच्या आरंभी नाट्यकर्ता व प्रेक्षकसमूह यांना पूजनीय असणाऱया देवदेवतांच्या गुणवर्णनपर प्रार्थना येतात. पूजनीय देवदेवतांमध्ये विघ्नेश्वर (गणपती), शारदा, विष्णू आणि शंकर या देवतांचाही समावेश झालेला दिसतो.

मराठ्यांचे तंजावर राज्य हे दक्षिणेतील तमीळनाडू या भौगोलिक क्षेत्रात येते. मूलतः या क्षेत्रात शंकरदेवतेला परम महत्त्व लाभलेले होते. त्यागेश्वर (महादेव) हे भोसले राजांचे कुलदैवत होते. त्यामुळेच नाट्यगत प्रार्थनांमध्ये विविध नामाभिधानांनी संबोधिलेल्या त्यागेशाला सर्वोच्च स्थान प्राप्त झालेले दिसते. या प्रार्थना भक्तिरसात गुंफलेल्या आहेत.

तंजावरी मराठी नाटकारंभी इष्ट-देवदेवतांच्या प्रार्थना झाल्यानंतर नाट्यप्रयोगकाली कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून विघ्नेश्वरास रंगमंचावर आमंत्रित केले जाते. विघ्नेश्वर येऊन नर्तन करीत प्रयोगास शुभाशीर्वाद देतो. विघ्नेश्वराचे रंगमंचावर आगमन होण्यापूर्वी त्याची रंगवेषभूषा कशा प्रकारची आहे. या देवतेचे वैशिष्ट्य काय याचे पद्यात वर्णन केले जाते. कथानक पुढे नेण्याची एक विशिष्ट पद्धत तंजावरी मराठी नाटककारांनी अवलंबलेली दिसते. सूत्रधार ज्याप्रमाणे पुढे कोणता नाट्यप्रसंग अभिनीत होणार आहे याचे निवेदन करतो त्याप्रमाणे अनेकदा नाट्यकथागत पात्रही निवेदन करते. त्यामुळे कथानकास गती मिळण्याचे पारंपरिक कार्य तर साधतेच, पण त्याचबरोबर घडून गेलेल्या घटनांमागील कारणमीमांसाही उलगडली जाते.

या प्रकारच्या नाट्यतंत्रात अंशात्मक बदल जरी आढळला, तरी मूळ तंत्रात्मक आकृतीस फारसा धक्का लागणार नाही याकडे तंजावरी नाट्यकर्त्यांनी लक्ष पुरवलेले दिसते. विशेष म्हणजे कालपरत्वे काही बदल करत आधुनिक संगीत रंगभूमीवर ही नाट्यतंत्रे उपयोजिली गेलेली दिसतात. एखादा नाट्यप्रसंग जेव्हा पद्यरूपात सादर करावयाचा असतो तेव्हा नाटककारांनी प्रामुख्याने दरू रचनेचा अवलंब केलेला दिसतो. ‘दरू म्हणजे नृत्य-पद्यप्रकार होय. दरू हा नाट्यघटक तमीळनाडूमध्ये भागवतमेळा या लोकनाट्यप्रकारापासून पुढे चालत आलेला आहे.’ असे अनेक विद्वानांचे मत असलेले दिसते.

मराठी रंगभूमीचे आणि मराठी नाटकाचे जे अनेक ऐतिहासिक प्रेरणास्त्रोत आहेत त्यांपैकी तंजावरी रंगभूमी आणि नाटक हा एक महत्त्वाचा प्रेरणास्त्रोत आहे. इतकेच नाही तर तंजावरी मराठी रंगभूमी आणि नाटक यांचे अनेक गुणविशेष हे मराठी नाटकाचेही गुणविशेष आहेत. तंजावरी मराठी नाटकाचा बहिर्रंग आणि अंतररंग जे विशेष बाळगतात तेच विशेष मराठी नाटकातही आढळतात. मराठी नाटकामध्ये जसे काही संकेत ग्रीक आणि संस्कृत रंगभूमीच्या अनुभवातून आले आहेत तसेच ते तंजावरी मराठी रंगभूमीकडूनही प्राप्त झाले आहेत.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)