अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला, वॉशिंग्टनने तीन तेलवाहू जहाजांना केले लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकन लष्कराने शनिवारी इराणच्या तीन तेल टँकर्सवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. अमेरिकन युद्धनौकांवर इराणकडून झालेल्या हल्ल्यांच्या आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास महिनाभराच्या शांततेनंतर गेल्या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आला.

टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्या तीन इराणी टँकर्सवर हल्ला करण्यात आला, ते एका गुप्त नेटवर्कचा भाग होते. हे नेटवर्क इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि त्यांच्या समर्थक गटांना निधी पुरवण्यासाठी मदत करत होते.

दुसरीकडे इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, चार अमेरिकन क्षेपणास्त्रांनी खार्ग बेटापासून सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या एका टँकरला लक्ष्य केले. खार्ग बेट हे इराणसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण याच टर्मिनलवरून देशातील बहुतांश तेलाची निर्यात होते. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे इराणने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात संघर्ष तीव्र झाला असून, अमेरिकन लष्कराने महिनाभराच्या खंडानंतर इराणी लक्ष्यांवर हल्ले पुन्हा सुरू केले आहेत.