इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा भीषण स्फोट, ५० हजार फुटांपर्यंत उसळले राखेचे लोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशियातील अनाक क्राकाटोआ या सक्रिय ज्वालामुखीचा रविवारी पहाटे भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे आकाशात तब्बल ५० हजार फुटांपर्यंत राखेचे लोट उसळले. हवेत पसरलेल्या या राखेमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जकार्ताच्या सुकर्णो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे काही काळासाठी थांबवण्यात आली होती. परिणामी २०९ उड्डाणे रद्द किंवा विस्कळीत झाली असून सुमारे २२,८०० प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.

जावा आणि सुमात्रा बेटांच्या दरम्यान सुंदा सामुद्रधुनीत असलेल्या या ज्वालामुखीत शनिवारी रात्रीपासूनच अंतर्गत हालचाली वाढल्या होत्या. रविवारी पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी झालेला हा मोठा स्फोट सुमारे ३० सेकंद चालला. यानंतर राखेचे दोन मोठे ढग निर्माण झाले. पहिला ढग सुमारे २० हजार फूट उंचीवर पोहोचून ईशान्येकडे गेला, ज्यामुळे जकार्ता, बॅन्टेन आणि पश्चिम जावा परिसर प्रभावित झाला. तर दुसरा ढग ५० हजार फूट उंचीवर पोहोचून पश्चिम आणि वायव्येकडे पसरला. याचा फटका लामपुंग, बेंगकुलू, सुंदा सामुद्रधुनीचा दक्षिण भाग आणि सुमात्राच्या पश्चिमेकडील हिंदी महासागराच्या काही भागाला बसला.

हवेतील ज्वालामुखीच्या राखेमुळे विमानाच्या इंजिनला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षेचा उपाय म्हणून सुकर्णो-हट्टा विमानतळ प्रशासनाने सुरुवातीला पहाटे ५:३० आणि नंतर सकाळी ९:३० वाजेपर्यंत उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे विमानतळावर उभ्या असलेल्या १७० विमानांचे उड्डाण रखडले. आंतरराष्ट्रीय मार्गांवर, विशेषतः सिंगापूरकडे जाणाऱ्या उड्डाणांना सर्वाधिक फटका बसला. यासोबतच हाँगकाँग, सिडनी, अ‍ॅमस्टरडॅम, सोल, दोहा आणि क्वालालंपूरच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला किंवा ती रद्द करण्यात आली. काही देशांतर्गत उड्डाणांवरही याचा थेट परिणाम झाला.