
>> विनायक
पायाखाली काचा म्हटल्यावर कोणाला ‘शोले’ चित्रपटातला ‘बसंती’चा नाच आठवेल कदाचित, पण विषय असा पायाला ‘टोचणाऱ्या काचां’चा नाही. काचेचा सूक्ष्म कण जरी पायात गेला तरी ते किती वेदनादायक ठरते याचा अनुभव आपण प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. काचांचे विखुरलेले तुकडे प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरानंतर कमी झाले खरे, पण त्यामुळे एक भयावह प्रदूषण मात्र वाढलं. अर्थात आवश्यक तिथे काळजी घेऊन काचेची भांडी वापरात आणावीच लागतात. काचेच्या भांडय़ातले पदार्थ ‘कळकत’ नाहीत. म्हणजे आंबत नाहीत किंवा तांब्या-पितळेच्या कल्हई नसलेल्या भांड्यांमध्ये ते ‘हिरवट’ रंगाचे होतात. तसेही होत नाहीत. सुंदर काच सामान दिसायला सुबक असतं.
अशा नाजूक वस्तूंपलीकडेही काचेचे दरवाजे, खिडक्या, डायनिंग टेबल, टीपॉय असे कितीतरी उपयोग केले जातात. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना प्लॅस्टिक किंवा धातूची भांडी वापरताच येत नाहीत. तेव्हा काच उपयुक्त ठरते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं रूप दाखवणारा आरसा जसा काचेचा असतो तसंच आत्मरक्षण करणारी बुलेटप्रूफ काचही माणसाला सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अर्थात भांडय़ांची, आरशाची, ध्वनिरोधक खिडक्यांची, वैज्ञानिक उपकरणांची काच वेगवेगळ्या गुणधर्माची असते. त्यामध्ये एखाद्या पुलाखालचा ‘स्लॅब’ म्हणून वापरली जाणारी काच तर फारच महत्त्वाची.
अशा पायाखालच्या भक्कम काचेची निर्मिती आणि वापर जगात सर्वत्र वाढतोय. आपल्याकडेही तामीळनाडूतील कन्यापुमारी येथील तिरुवेल्लावूर यांच्या भव्य पुतळ्यापाशी छोटासा काचेचा पूल बांधण्यात आलेला आहे. दोन्ही कठडे आणि पायाखाली काचेचीच ‘जमीन’ असलेल्या या पुलामधून त्याखालचा उसळता सागर आरपार दिसतो. काचेच्या उंच पुलावरून तळाखालील खोल दरी किंवा सागरी लाटा पाहण्यात एक प्रकारचे भयावह ‘थ्रील’ असते. बहुतेक ठिकाणी काचेचे पूल पर्यटकांसाठी काहीतरी विस्मयकारी वाटणारी गोष्ट असावी म्हणून बांधले जातात. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसायाला चालनाही मिळते.
पहिला-वहिला ‘ग्लास बॉटम’ पूल 2016 मध्ये चीनमध्ये बांधण्यात आला. त्याची दशकपूर्ती गेल्या 20 ऑगस्टला झाली. त्यानिमित्ताने काचेच्या पुलांवरचा हा लेख. जगाच्या दृष्टीने त्या वेळी ही अशक्य नव्हे, पण अभिनव गोष्ट होती. आता तर काही मॉलमध्येही पंधरा-वीस फुटांचे ग्लास बॉटम ‘मार्ग’ असतात.
चीनच्या हुनान प्रांतातील झॅन्गजियाझी येथे एका नॅशनल पार्पमध्ये हा 1410 फुटांचा ‘ग्लास बॉटम’ पूल बांधण्यात आला. दाट वनाचा अनुभव जवळून घेता यावा आणि वन्य प्राण्यांना त्रास न देता सृष्टीसौंदर्य चहूबाजूंनी दिसावे अशा दृष्टीने बांधलेला हा बहुउद्देशीय पूल दरीच्या तळापासून 980 फूट उंचीवर आहे. म्हणजे पायाखालच्या काचेतून एवढी खोल दरी नजरेत भरणार. हा पूल एकूण 120 टेम्पर्ड काचांच्या तिहेरी थरातून (ट्रिपल लेयर) साकारला असून तो धातूच्या चौकटीत घट्ट बसवलेला आहे. जगातला हा सध्याचा सर्वात जास्त लांबीचा काचेचा पूल आहे.
आता या भक्कम पुलामागचं वैज्ञानिक तंत्रज्ञान काय? ते सर्वच काच पुलासाठी वापरले जात असल्याने थोडक्यात जाणून घेऊ. ही टेम्पर्ड काच सामान्य काचेपेक्षा चार ते पाच पटींनी मजबूत असते. ही काच भरपूर वजन, वादळी वारे, अति गरम किंवा शीत वातावरण यापैकी कशामुळेही तडकत किंवा फुटत नाही. त्यातूनही ती तडकलीच तरी चुरा होऊन खाली न पडता सूक्ष्म कणांमध्ये विभागून तशीच राहते. (स्मॉल ग्रॅन्युअल्समुळे) पूल बांधण्यासाठी अशा काचेच्या अनेक थरांचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या थराला तडा गेला तरी ती पूर्णपणे तुटत नाही. दोन थरांमध्ये ‘एजीपी’ किंवा ‘पीव्हीबी’ प्रकारच्या शक्तिशाली प्लॅस्टिकचेही अंतस्तर (इंटरलेयर) असल्याने धोका उद्भवत नाही.
यातील ‘टेम्परिंग’ प्रक्रियेत काच एकदम अतिशय गरम करून लगेच अतिशीत केली जाते. या ‘हिटिंग-पुलिंग प्रोसेस’मुळे काचेच्या कणांची शक्ती वाढते. काचेला अपेक्षित आकार दिल्यावर मगच ही प्रक्रिया केली जाते. अशी ग्लास प्रचंड ‘ओव्हन’मध्ये टापून 600 ते 700 अंश सेल्सिअस तापमानाला गरम केली जाते आणि ती मऊ होण्याचा (सॉफ्टनिंग) बेतात असताना अतिशीत हवेचे झोत सोडून थंड करण्यात येते. त्यामुळे काचेचा बाह्यभाग लवकर आक्रसतो, पण अंतर्भाग ‘पूल’ होण्यास थोडा वेळ लागतो. यात वरचा भाग ‘टेन्शन’, तर अंतर्भाग ‘टेन्शन’ (दाब) अनुभवतो. त्यातून उष्णतेचे धक्के (शॉक) सहन करण्याची ताकद या काचेत येते.
मग क्रमाक्रमाने ‘स्ट्राँग’ केलेल्या अशा काचा मोटारींच्या खिडक्यांपासून ते मोठय़ा पुलांपर्यंत वापरल्या जातात. त्यामध्ये वापरलेले ‘पीव्हीबी’ रसायन काचेच्या थरांच्या घट्ट बांधणीसाठी, तर एजीपी प्लॅस्टिक काचेला अधिक मजबूतपणा आणते. पीव्हीबी म्हणजे पॉलिवायनल ब्युटिरल प्रोसेसमध्ये रसायनाद्वारे काचेवर ‘लॅमिनेशन’ (कोटिंग) होतं. अधिक तांत्रिक माहिती क्लिष्ट होईल. काचेचा पूल अशा अनेक कारणांनी ‘सेफ’ असतो. एवढंच लक्षात ठेवायचं. जगात असे सुमारे ‘पायाखाली काचा’ असलेले 2300 पूल आहेत!





























































