
शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी आणि आवश्यक दुरुस्ती या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी शाळांच्या गरजेनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. गरज भासल्यास सीएसआर निधीचा वापर करण्याचा विचार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज दिली
शाळांतील सुविधांबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक तसेच विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व राष्ट्रभक्तीची जडणघडण यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्यात ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार असून, आढळणाऱया त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी सांगितले.

























































