भिवंडीत एकाच दिवशी एकच कुत्रा 32 जणांना चावला; ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये प्रचंड दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भटक्या कुत्र्यांची भिवंडीत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एकाच दिवशी एकच कुत्रा ३२ जणांना चावला असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कुत्र्याच्या या हल्ल्यात लहान मुले जखमी झाली असून त्यांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या चार महिन्यांत ३ हजार २९२ जणांना कुत्रा चावला असून लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भिवंडीवासीयांनी केली आहे.

रविवारी सायंकाळी ब्रह्मानंद परिसरात लहान मुले बाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने थेट मुलांवर हल्ला केला. पाहता पाहता कुत्र्याने ३२ जणांना चावा घेतला. या पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांना टार्गेट केले असून त्यात सुनील जयस्वाल, ग्रंथ आणि हरेश डोंगरे यांचे अक्षरशः लचके तोडले आहेत. या जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून सोमवारी सकाळी घरी पाठवण्यात आले. दरम्यान मोकाट श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे आहेत डेंजर झोन

ईदगाह, शांतिनगर, कामतघर, नदीनाका, गायत्रीनगर, निजामपुरा, कोंबडपाडा यांसह शहरातील विविध भागांत मोकाट श्वानांचे डेंजर झोन निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांवर श्वानांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नसबंदी मोहीम पुन्हा सुरू करा

पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात २४ हजारांहून अधिक मोकाट श्वान असून त्यापैकी ७ ते ९ हजार श्वानांची नसबंदी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र या श्वानांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भिवंडी पालिकेकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याची टीका नागरिकांनी केली आहे. मोकाट श्वानांची नसबंदी मोहीम पुन्हा जोरदार सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

  • एप्रिलमध्ये १ हजार ८७, मे महिन्यात ९०७, जूनमध्ये ६५६ तर जुलैमध्ये ६४२ नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कळपाने फिरणाऱ्या श्वानांमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.