
सरकारचे शिष्टमंडळ आता जरांगेकडे जाणार नाही, अशा वल्गना करून मराठा समाजाच्या भावनावर मीठ चोळण्याचा प्रकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने आज हदगावात त्यांचे बॅनर फाडून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे गेल्या बारा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यातच काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी “आम्ही सर्व निर्णय घेतले आहेत, सरकारचे शिष्टमंडळ आता जरांगेकडे जाणार नाही,” असे वक्तव्य केल्याने मराठा आंदोलक संतप्त झाले आहेत. आज नांदेड जिल्ह्यात हदगाव येथे मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत हदगाव रोडवर लावण्यात आलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर काढून ते फाडून टाकले. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, विखे पाटील मुर्दाबाद… अशा घोषणा यावेळी संतप्त आंदोलकांनी दिल्या.
समाजाच्या मागण्यासाठी निर्णायक तोडगा काढून अंतरवाली सराटी येथे तुम्हाला जावेच लागेल. उद्धट भाषा वापरून सरकार आता जरांगेकडे जाणार नाही, असे उत्तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने मराठा आंदोलक संतप्त झाले. हदगावमध्ये झालेल्या या प्रकारानंतर अन्य ठिकाणी देखील असे आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी सांगितले. यावेळी विखे पाटील यांच्या उद्धट वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
दरम्यान, बरडशेवाळ ता. हदगाव येथे देखील मराठा आंदोलकांनी तब्बल तीन तास रास्तारोको करून सरकारचा निषेध केला. यामुळे बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती.





























































