
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहराच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची ऐतिहासिक व पारंपरिक परंपरा लाभली आहे. या पारंपरिक गणपतीचे आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले.
पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त परिसरातील नागरिक, भाविक तसेच जोशी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तीचे स्वागत करण्यात आले.विशेष म्हणजे, या गणपतीच्या आगमनाला केवळ धार्मिक महत्त्व नसून देवरुखच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेतही त्याचे विशेष स्थान आहे. काळ बदलला, अनेक गोष्टी बदलल्या; मात्र शेकडो वर्षांची परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.
गणरायाच्या आगमनावेळी “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. फुलांची आकर्षक सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय वातावरणामुळे चौसुपी परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळाला.शेकडो वर्षांची परंपरा पुढे नेत आलेल्या या मानाच्या गणपतीच्या आगमनाने देवरुखच्या गणेशोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
देवरुख वरची आळी जोशी चौसोपी वाड्यातील सिद्धिविनायक मंदिरातील अश्वारूढ गणेशमूर्तीचे सवाद्य मिरवणूकीने आगमन झाले.मोरगावच्या उत्सवाप्रमाणे हा गणेशोत्सव साजरा होतो. या उत्सवाला ३७५ हुन अधिक वर्षांची परंपरा आहे.































































