Karad News – उसात लपलेल्या सोनसाखळी चोराला ‘जॅक’ने शोधले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नदीकाठच्या शिवारात जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करून उसाच्या शेतात लपलेल्या सराईत आरोपीला कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही घटना दुशेरे (ता. कराड) येथील डाग शिवाराजवळ घडली आहे. यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘जॅक’ या श्वानाने आरोपीचा माग काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वैभव विठ्ठल कोठावळे (वय 27, रा. माळवाडी-मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी (दि. 11) दुपारी दुशेरे गावच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी संशयित व्यक्ती उसाच्या शेतात पळून गेल्याचे सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी आरोपीच्या शोधासाठी श्वान पथकाची मदत घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सायंकाळी श्वान पथकासह पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या दुचाकीवरील कपडय़ांच्या पिशवीचा वास ‘जॅक’ला देण्यात आला. त्यानंतर जॅकने उसाच्या शेतातून माग काढत लपलेल्या आरोपीपर्यंत पोलिसांना नेले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चोरी केल्याचे कबूल केले. दरम्यान, आरोपीकडून मिळालेली यामाहा आर-15 दुचाकीदेखील चोरीची असून, या गाडीबद्दल सांगलीत गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी समजले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील, हवालदार दत्तात्रय तायशेटे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढची कारवाई करीत आहेत.