राम कदम यांच्या खटल्यातील सरकारी वकिलाची बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मारहाणप्रकरणी भाजप आमदार राम कदम आरोपी असलेल्या खटल्यातील सरकारी वकिलांची मुंबई बाहेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीला तक्रारदाराच्या वतीने आक्षेप घेण्यात आला असून खटल्याच्या या टप्प्यावर सरकारी वकिलांची बदली कशासाठी असा सवाल त्यांनी विचारला आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी 2014 साली गौतम बुद्ध यांच्या अस्थी त्यांच्या मतदारसंघात घेऊन येणार असल्याची जाहिरात केली. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता रोहित तांबे यांनी सदर घटनेची शहानिशा न करता जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर रोहित याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात आमदार राम कदम व इतर काही जणांविरोधात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सत्र न्यायालयात या प्रकरणी खटल्यावर सुनावणी सुरू आहे. या खटल्याचे व्हिडीओ रेकार्ंडग करण्यात यावे असा अर्ज फिर्यादी तर्फे अॅड. विनोद सातपुते यांनी दाखल केला. या अर्जाची दखल घेत सत्र न्यायालयाच्या तत्कालीन न्यायाधीश आदिती कदम यांनी एससीएसटी कायद्यांतर्गत या खटल्याचे व्हिडीओ रेकार्ंडग करण्याचे तोंडी निर्देश प्रशासनाला दिले होते. या खटल्यावर सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

तक्रारदाराचा आक्षेप

या प्रकरणात सरकारच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले सरकारी वकील सुखदेव यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. याला तक्रारदारांचे वकील अॅड. विनोद सातपुते यांनी आक्षेप घेतला असून या खटल्यावर परिणाम होण्याची शंका व्यक्त केली आहे.