
हिंदुस्थानात बचतीच्या स्वरूपात मोठा बदल होत चालला आहे. अधिक परतावा देणाऱ्या वित्तीय योजनांमध्ये देशातील अनेक कुटुंब अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत. त्यासाठी ते शेअरबाजाराशी संबंधित जोखिम उचलत आहे. फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया म्युच्युअल फंडने आज प्रसिद्ध केलेल्या ‘फायनान्शियलरायझेशन ऑफ सेव्हिंग्ज इन इंडिया – फ्रॉम सेफ्टी टू स्केल’ या अहवालात हा महत्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे.
कौटुंबिक बचत आता पूर्वीच्या अनौपचारिक किंवा भौतिक मालमत्तेकडून झपाट्याने औपचारिक, संस्थात्मक आणि शेअरबाजाराशी संलग्न असलेल्या वित्तीय गुंतवणूक योजनांकडे वळत चालली आहे. वित्तीयीकरण हे देशाच्या आगामी वाढीच्या टप्प्याचे ठळक आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले आहे. उत्पन्नाची उंचावलेली पातळी, डिजिटल सेवांसाठी सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या व्यापक पायाभूत सुविधा, सेवांची सहज उपलब्धता आणि वाढती आर्थिक जागरूकता या सर्व घटकांचा मिलाफ होऊन कौटुंबिक बचत आणि गुंतवणुकीचे स्वरुप बदलण्याच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर हिंदुस्थान सध्या उभा असल्याचे फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्यूअल फंडाच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
कौटुंबिक बचत अधिकाधिक प्रमाणात बँक, म्युच्यूअल फंड आणि शेअरबाजारासारख्या अधिकृत आणि औपचारिक वित्तीय पर्यायांमध्ये गुंतवली जाऊ लागल्याने देशातच गुंतवणूकीसाठी मोठा निधी जमा होत आहे, बँक आणि वित्तीय संस्थांची भूमिका अधिक प्रभावी होत आहे आणि देशाच्या विविध भागातून तसेच विविध वयोगटातील गुंतवणूकदारांचा सहभागही वाढत चालला आहे. हे बदल आता केवळ एका विशिष्ट वर्गापुरती किंवा मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नसून ती लहान शहरांमध्ये, गावांमध्ये विविध वयोगटांत आणि वित्तीय योजनांच्या विविध प्रकारांमध्ये वेगाने विस्तारत असल्याचे फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडने या अहवालात म्हटले आहे.
देशाचा वित्तीयीकरणाचा प्रवास अजूनही प्रारंभिक टप्प्यातच
देशातील वैयक्तिक आणि सर्वसामान्य (रिटेल) गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, एसआयपीचा वेगाने होत असलेला स्वीकार आणि तरुण गुंतवणूकदारांकडून शेअरबाजार संलग्न बचतीला प्राधान्य देण्याबाबत झालेला मानसिक बदल यामुळे म्युच्युअल फंड हाताळत असलेला एकूण निधी (एयूएम) जुलै २०२१ मधील ३५.३२ लाख कोटी रुपयांवरून जुलै २०२६ मध्ये ८५.७६ लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहचला आहे. एयूएमचा चक्रवाढ वार्षिक वृध्दी दर (सीएजीआर) सुमारे १९ टक्के होता. भक्कम वाढ होऊनही, जागतिक प्रमाणानुसार हिंदुस्थानात गुंतवणूकीचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. अमेरिकेत पेन्शन सुधारणा आणि ठेवींऐवजी इतर पर्यायांकडे वळाल्यामुळे १९८० ते २००० दरम्यान म्युच्युअल फंड मालमत्तेत झपाट्याने वाढ झाली आणि कुटुंबांचा गुंतवणूक सहभाग वाढला. देशाचे यासंबंधित गुंतवणूकीचे प्रमाण खूप संथ गतीने वाढले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी बाजारपेठ अजूनही प्रारंभीच्या किंवा मधल्या टप्प्यात आहे, असे फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडने म्हटले आहे.
जसजसे खर्च करण्यायोग्य उत्पन्न वाढत जाईल, त्याचबरोबर पारंपारिक बचतीतील निधी म्युच्युअल फंडात गुंतवण्याचे प्रमाणही वाढत राहील, तसतसे चक्रवाढ दराचे प्रमाण भविष्यात उंचावत जाण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे म्युच्यूअल फंड उद्योगाला दीर्घकालीन चक्रवाढ वाढीची संधी निर्माण होऊ शकते.
महत्त्वाचे: गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.





























































