अणुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; 20 प्रवासी थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पन्हाळा-कोल्हापूरहून अणुस्कुरा मार्गे देवरुखच्या दिशेने जाणाऱ्या आयशर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. बुधवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास अणुस्कुरा घाटात हा अपघात झाला. या वाहनातून एकूण 20 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे नमनाचा कार्यक्रम आटोपून हे प्रवासी देवरुखच्या दिशेने निघाले होते. अणुस्कुरा घाटातून वाहन जात असताना अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि आयशर रस्त्यावर पलटी झाले. हे वाहन देवरुख येथील सुभाष वास्कर चालवत होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, पलटी झालेले वाहन रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पांगरीचे सरपंच अमर जाधव यांच्या माध्यमातून तातडीने क्रेनची व्यवस्था करून दिली. क्रेनच्या साहाय्याने आयशर बाजूला करून सरळ करण्यात आल्याने अणुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. अपघातस्थळी रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल स्वनिल घाटगे आणि पोलीस कॉन्स्टेबल संपत माने यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम केले.