
मुंबई गुन्हे शाखेने म्युलर बँक खात्यांद्वारे ऑनलाइन सायबर फसवणुकीचा गोव्यातून सुरू असलेला कारभार उद्ध्वस्त केला. तेथील क व्हिवा भाड्याने घेऊन ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा गैरकारभार सुरू होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी सात जणांची टोळी जेरबंद केली.
मोबाईलचे सिमकार्ड व विविध बँक खात्यांचा गैरवापर करून एक टोळी नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहे. गोव्यात एक व्हिला भाडेतत्त्वावर घेऊन ते भामटे आर्थिक फसवणूक करीत असल्याची माहिती मिळताच युनिट-५
चे स.पो.नि. धनराज चौधरी, सचिन बाराते, उपनिरीक्षक इंगोले, नितीन पालांडे अंकुश न्यायनिर्गुणे व पथकाने गोव्यात जाऊन वारका येथील एका रिसॉर्टमध्ये असलेल्या व्हिलावर छापा टाकला. त्यावेळी तेथे सात जण मिळून आले.
दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या त्या सात जणांना प्रशिक्षण देऊन म्युलर खात्यांचा वापर करून ऑनलाइन सायबर फसवणुकीचे पैसे अन्यत्र वळते करून ते हडपण्याचे काम करून घेतले जात असल्याचे आढळून आले. ते सातही जण गुजरातचे असून त्यांनी आतापर्यंत शेकडो कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे.
विशिष्ट अॅप्लिकेशनचा वापर
अटक आरोपींकडून १२ पासबुक, ५९ एटीएम कार्ड, ५१ मोबाईल, १६७ सीमकार्ड, ९ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. महिना दीड लाख रुपये भाडे देऊन आरोपींचा गोरखधंदा त्या व्हिलामध्ये सुरू होता. यापूर्वीचदेखील गुन्हे शाखेने अशीच कारवाई गोव्यात केली होती. आरोपी एका अॅप्लिकेशनद्वारे पैशांची अफरातफर करत होते. युनिट-५ अधिक तपास करत आहेत.


























































