
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना वरळी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यंदाचे हे १६५वे रक्तदान शिबीर आहे. शाखेतर्फे दरमहा १७ तारखेला या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी नाका येथील शिवसेना शाखेत दरमहा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिवसेनाप्रमुखांचे १७नोव्हेंबर २०१२ रोजी महानिर्वाण झाल्यानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी दर महिन्याच्या १७ तारखेला या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी १७सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान करण्याचे आवाहन आयोजक अरविंद भोसले यांनी केले आहे. संपर्क : ९८२१५८१८६०.
संगमेश्वरमध्ये गवा रेड्याची दहशत
संगमेश्वर : तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात गवा रेड्यांच्या सततच्या दर्शनाने ग्रामस्थ धास्तावले आहेत. आंबव पोंक्षे गावात गेले दोन तीन वर्षांपासून तुरळच्या सीमेकडे पकडेवाडी, भुवडवाडीच्या बाजूला गवा रेड्यांचे कळप दिसायला लागले. गतवर्षापासून तर त्यांनी शेतामध्ये धुमाकूळ घालायला सुरूवात केली. भातशेती, पावटा, कडवा, कुळीथ आदी पिकांची नासधूस केल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अजस्त्र प्राण्यांकडून नव्याने लावलेली आंबा, काजूच्या झाडांची नासधूस होत आहे. आता तर चक्क ह्या गवा रेड्यांचे कळप आंबव पोंक्षे-सरंद आणि आंबव पोंक्षे आरवली ह्या मुख्य मार्गांवर अचानक दिसत असल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. वनविभागाने अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत.

























































