
सुंदर मुलांचा फोटो वापरून समाजमाध्यमांवर बनावट खाते खोलायचे. मग तरुणी अथवा महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करत खंडणी उकळायची. अशाप्रकारे रिकामटेकडे धंदे करणाऱ्या पंजाबातील २२ वर्षीय तरुणाला मुलुंड पोलिसांनी पकडून आणला आहे.
एक तरुण स्नॅपचॅट या माध्यमावर मला ब्लॅकमेलिंग करून माझ्याकडून किमती वस्तू व पैशांची मागणी करतोय. त्याप्रमाणे नाही दिल्यास माझे आक्षेपार्ह फोटो नातेवाईक, मित्रांमध्ये प्रसारित करत असल्याची तक्रार
एका तरुणीने मुलुंड पोलिसांत दिली. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अभिजित टेकवडे, उपनिरीक्षक सुमित सोनावणे, परशुराम सूर्यगंध व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबींच्या सहाय्याने तपास करीत असताना आरोपी हा पंजाबच्या आदर्श नगरात राहणारा असून सतनाम सिंग (२२) असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्याचे घर गाठून सतनामला उचलून आणले.
आयफोन, ४० हजार दिले नाही म्हणून…
पीडित तरुणीलादेखील सतनामने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. आधी एक हजार मग ३ हजार अशी मागणी करून मग आयफोन, ४० हजार देण्यास बोलू लागला. हे देणे तरुणीला शक्य होत नसल्याने त्याने तिचे नग्न फोटो व व्हिडीओ तिच्या आईला, शिक्षकाला व नातेवाईकांना पाठवले होते. सतनामचे वडील हलवाई तर आई खासगी काम करते आणि सतनाम अशा प्रकारचे ब्लें कमेलिंग व खंडणी उकळण्याचे काम करतो.
विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक
घरकाम करणाऱ्या महिलेला अश्लील व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार महिला ही खार येथे एका ठिकाणी घरकाम करते. त्याच परिसरात अटक आरोपी हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शुक्रवारी सकाळी महिलेला अज्ञात व्यक्तीने व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवले होते. दुपारी ती कामावरून घरी जात असताना ते व्हॉइस रेकॉर्डिंग दिसून आले. घडल्याप्रकरणी तिने खार पोलीस ठाण्यात ‘धाव घेतली.
घरफोडीप्रकरणी महिलेला अटक
नऊ लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी एका महिलेला साकीनाका पोलिसांनी अटक केली. चोरीचे दागिने विकण्यास भावाला मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी तबरेज ऊर्फ रेहान मुक्तार सय्यद आणि राजीकुमार महेंद्रराम जयस्वाललाही अटक केली.


























































