
हे सगळे मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये बसलेले बसे बैल तुम्हाला न्याय देतील? ना यांचा शेतीला उपयोग, ना कशाला उपयोग. हे तुम्हाला काय न्याय देणार? अशी तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डागली. मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास, तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलनाच्या समारोपात उद्धव ठाकरे महायुती सरकारवर कडाडले.
उपस्थित सर्व मराठवाड्याला न्याय देण्यासाठी जमललेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… आज १७ सप्टेंबर आहे, दोन-तीन गोष्टी एकत्र आहे. एकतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. आता याच्या शुभेच्छ्या द्यायच्या, साजरा करायचा नेमकं काय करायचं? दुसरं आपल्या माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस आहे. तो कसा साजरा करायचा, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण जे काही आंदोलन करतोय, मराठवाड्यावरती झालेल्या अन्यायाबद्दल ज्या काही तुम्ही वाचा फोडत आहात तुम्हाला सगळ्यांना आपले दयाळु पंतप्रधान माफ केल्या शिवाय राहणार नाहीत. पण ते कर्जमाफी नाही करणार. पण तुम्ही न्याय्य हक्कासाठी उठवलेल्या आवाजाबद्दल ते नक्की माफ करतील. आणि तिसरं म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती असते. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शहरामध्ये जर का आपण पाहिलं तर छान बोर्ड लागलेत. आणि ते नुसते बोर्ड पाहून मी गेलो तर मला असं वाटेल मराठवाडा काय अगदी आनंदीआनंदात आहे. इकडे दुष्काळ कुठे, इथे दुधाचा पाऊस पडत असेल. इकडे तर सगळं आनंदीआनंद असेल. पण जमिनीवरती काय आहे? हा मुद्दा कोणाच्याच लक्षात येत नाही. माननीय मुख्यमंत्री इकडे येऊन गेले. मला माहित नाही, आपल्या आनंदोलनावरती ते काहीतरी बोलले. आता ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत का? असतील तर त्यांनी इकडे यावं आणि आमचे जे काही प्रश्न आहेत ही मंडळी गावागावातून आलेली आहेत, या प्रश्नाला उत्तर द्यावीत. उपमुख्यमंत्री पण होते का? ते ढोकाळा खायला गेलेत. उपमुख्यमंत्र्यांता मी कार्यक्रम पाहिला गुजरातमध्ये गेलेत. मला वाटलं मराठवाडा मुक्तीदिनाला येऊन जातील, नाही आले. मुख्यमंत्री सुद्धा आले आणि कार्यक्रम उरकून दिल्लीला गेले. याचं कारण काय? या सगळ्या व्यथा वेदना मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही कारण मी नुसतं बोलेन तुम्ही भोगता आहात. अंबादास दानवे, चंद्रकात खैरे, प्रवीण स्वामी, राहुल पाटील, कैलास पाटील तुमच्या पैकी कोणाच्याही हातात माइक दिला तरी तुम्ही व्यवस्थित बोलू शकाल कारण तुमचे अनुभवाचे बोल आहेत. पण हे अनुभावाचे बोल जे आमचे मुख्यमंत्री पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करायला तिकडे जाताहेत, जे आमचे उपमुख्यमंत्री पुरस्कार श्री… स्वतःच स्वतःला पुरस्कार घेतला आहे त्यांनी विकत. म्हणजे आमदार, खासदार तर विकत घेताहेत पुरस्कार पण विकत घेताहेत. मला असं वाटतं ते आपल्याला सांगितील तुमसे ना हो पायेगा. हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार. ते उलट आपल्याला सांगतील जो हमने किया, पुरस्कार खरिद लिया, तुमसे ना हो पायेगा. पण यांना माझं आव्हान आहे.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठवाड्यातले सर्व खासदार… हो आता गद्दारांसकट सगळे खासदार जे स्वतःच्या विकासासाठी तिकडे गेलेत मराठवाड्याच्या विकासाचं नाव घेऊन आणि जे आपले हक्काचे आमदार सोडून इतर आमदार आहेत त्यांना म्हणावं तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही मराठवाड्याच्या व्यथा छातीठोकपणाने पंतप्रधानांच्या समोर मांडू शकता का? एकतरी असा मायेचा पूत ज्याला मराठवाड्याने आपला मानून निवडून दिलाय आणि जो गद्दार म्हणून तिकडे गेलाय, ओरिजनल त्यांचे सुद्धा निवडून आलेत त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये. म्हणून मराठवाडा आज असा अन्यायग्रस्त आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानसभेचं अधिवेशन होतं, लोकसभेचं अधिवेशन होतं हे सगळे जे प्रश्न आहेत हे काही या क्षणाला टपकलेले नाहीत. अनेक वर्षे हे चालत आलेलं आहे. मला तर एक विचित्र तुलना कराविशी वाटते तुम्ही सगळ्यांनी ती करा, कारण मराठवाडा हा लढणारा आहे, निजामाबरोबर लढणारा आहे हा मराठवाडा. त्यावेळेला जो निजामाबरोबर लढा दिला संघर्ष केला दर १७ सप्टेंबरला स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ अशी सगळ्यांची नावं घ्यायची सगळ्यांनी कसा लढा दिला. अरे त्यांनी लढा दिला तू काय करतोस आता? लढण्याची पार्श्वभूमी असणारा हा मराठवाडा हा रडणारा कधी झाला? का रडताय तुम्ही? आणि मग तुलना मी म्हणतोय ती विचित्र वाटेल कदाचित पत्रकार म्हणतील हे काय आहे? नाही पण करा. रझाकारांबरोबर लढताना जो संघर्ष झाला रक्तपात झाला होता. त्याच्या मराठवाड्याने किती आत्म आहुती दिली आणि मराठवाडा देशात आल्यानंतर गेल्या ७५ वर्षांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचे आकडे काढा. कदाचित आत्महत्या जास्त असतील. याच्यासाठी लढा दिलात तुम्ही? याच्यासाठी तुम्ही देशात आलात? याच्यासाठी तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिकडे उभा केलाय? जगातील सगळ्यात मोठा पुतळा. पण जगातील मोठा पुतळा उभारताना वल्लभभाईंनी इकडे ज्या दिवशी जिना गेला त्याच दिवशी म्हणजे तो दिवस त्यांनी निवडला नव्हता तो योगायोग होता. आणि त्यांना असा सल्लाही दिला होता कशाला आजचा दिवस? नाही ठरवलंय त्याप्रमाणे होणार ऑपरेशन पोलो.. फौजा घुसवल्या आणि निजामाला गुडघ्यावरती आणलं. आहे एवढी हिंमत? पाकव्याप्त कश्मिरमध्ये फौजा घुसवण्याची हिंतम आहे तुमची? ह्यांनी फौजा कुठे घुसवल्या? पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून फौजा घुसवल्या, भाजपसाठी फौजा घुसवल्या यांनी देशासाठी फौजा नाही घुसवल्या. आणि मग आम्ही आपलं लढत, रडत बसायचं. एक बातमी वाचली लातूरमधील एका शेतकऱ्याचा बैल वीज कोसळून मरण पावला. आणि मग आमचे दयावान मुख्यमंत्री तत्काळ त्याला बैल दिला. सोबती कोण दिला त्याचं माहित नाही, पण बैल दिला. आणि तो बैल दिल्यानंतर त्याच्या खांद्यावरती जू ठेवलं आणि तो बैल गपकन बसला. त्याच्या उपचाराचा खर्च शेतकऱ्याच्या डोक्यावर. म्हणजे हे सगळे मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये बसलेले बसे बैल तुम्हाला न्याय देतील? ना यांचा शेतीला उपयोग ना कशाला उपयोग. हे काय देणार तुम्हाला न्याय? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

























































