
उन्हाळा असो किंवा हिवाळा बहुतांशी घरांमध्ये दही हा पदार्थ सहज उपलब्ध असतो. जेवणासोबत दही, ताक, कढी किंवा कोशिंबीर अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्याचा वापर केला जातो. दही हे प्रथिने आणि कॅल्शियमसह काही महत्त्वाच्या पोषक घटकांचे स्रोत आहे.
दह्यामध्ये असलेल्या जिवंत सूक्ष्मजीवांमुळे काही व्यक्तींना पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून दह्याचा समावेश करता येतो.
शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असल्यास, दही हा फार उत्तम पर्याय मानला जातो. 200 ग्रॅम दह्यामध्ये 12 ग्रॅम प्रोटीन्स असते. त्यामुळे रोजच्या आहारात दह्याचा समावेश करणे खूप हितावह मानले जाते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी दही खाणे हे फार महत्त्वाचे मानले जाते. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त मानले जाते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दही हे फार महत्त्वाची भूमिका बजावते. दह्याचा वापर केवळ आहारापुरता मर्यादित नाही. अनेक घरगुती ब्युटी उपायांमध्येही दह्याचा वापर केला जातो. केसांना दही लावल्याने केस मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मेहंदी भिजवताना दही मिसळण्याची पद्धतही अनेक ठिकाणी प्रचलित आहे.
मात्र दही लावल्याने कोंडा किंवा केसगळती कायमची दूर होते, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. टाळूशी संबंधित समस्या वारंवार होत असल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.



























































